कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे मंत्री पार्थ चॅटर्जी माझ्या घरी पैसे ठेवायचे आणि ते 'मिनी-बँक' म्हणून वापरायचे, असा दावा बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जी यांनी केला आहे.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, अर्पिता मुखर्जी यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सांगितले आहे की "सर्व पैसे एका खोलीत ठेवले होते, ज्यामध्ये फक्त पार्थ चॅटर्जी आणि त्यांची माणसे जात होती."
याचबरोबर, मंत्री पार्थ चॅटर्जी दर आठवड्याला किंवा दर 10 दिवसांनी माझ्या घरी जात असत. पार्थ चॅटर्जी यांनी माझे घर आणि दुसऱ्या महिलेचे घर मिनी बँक म्हणून वापरले. ती दुसरी स्त्रीही जवळची मैत्रीण आहे, असेही अर्पिता मुखर्जी यांनी म्हटल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, शिक्षक भरती घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली आहे. सोमवारी कोलकाता न्यायालयाने दोघांनाही 10 दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने पार्थ चॅटर्जी यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती.
"दोषींना शिक्षा झाली पाहिजे, न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास"दुसरीकडे, मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "जर कोणी चुकीचे काम करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कालमर्यादा असावी ज्यामध्ये सत्य आणि न्यायालयाचा निर्णय बाहेर यावा. कोणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे. पक्ष सुद्धा कारवाई करेल. पण, मी माझ्याविरुद्ध चालवलेल्या द्वेषपूर्ण मोहिमेचा निषेध करते."
दरम्यान, मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेनंतर भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्ष टीएमसीविरोधात मोर्चा काढला आहे. बंगालमध्ये सरकारी पैशांची लूट सुरू असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. तर भाजप नेते दिलीप घोष यांनीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कोण आहेत अर्पिता मुखर्जी?ईडीच्या छापेमारीमुळे चर्चेत आलेल्या अर्पिता मुखर्जी या बांगला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होत्या. अर्पिता मुखर्जी यांनी त्यांच्या फिल्म करिअरमध्ये साइड रोल म्हणून काम केले आहे. बांगला सिनेमासोबतच ओडिया आणि तामिळ सिनेमातही त्यांनी काम केले आहे. अर्पिता मुखर्जी यांनी बांगला सिनेमातील सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीत यांचा लीड रोल असणाऱ्या काही सिनेमातही काम केले आहे. अमर अंतरनाड या सिनेमात त्यांनी अभिनय केला आहे. ईडीच्या कारवाईत अर्पिता यांच्या घरी 20 कोटी रोकड सापडल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आल्याचं केंद्रीय तपास यंत्रणांनी सांगितले.
मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीयअर्पिता मुखर्जी या मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. चॅटर्जी हे सरकारमधील शिक्षण मंत्री आहेत. मग पार्थ चॅटर्जी आणि सिनेमात साईड रोल करणारी अर्पिता मुखर्जी यांची ओळख कशी झाली हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तृणमूलचे नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी दक्षिण कोलकातामधील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीचे नेतृत्व करतात. ही कोलकाता येथील सर्वात मोठी दूर्गा पूजा समिती आहे. अर्पिता मुखर्जी 2019 आणि 2020 मध्ये पार्थ चॅटर्जी यांच्या दुर्गा पूजा सोहळ्यात प्रमुख चेहरा होती. तेव्हापासून या दोघांची ओळख झाली.