कोलकता - रोज वॅली चिटफंडप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) चौकशीचा फास आवळत बंगाली अभिनेत्री शुभ्रा कुंडूला समन्स बजावले आहे. शुभ्राच्या घरी नोटीस पाठवून ईडीने चौकशीसाठी गुरुवारी सॉल्टलेक येथील सीजीओ कॉम्प्लेक्सस्थित ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यास शुभ्राने नकार दिला आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुभ्राने दागदागिने खरेदी करताना जे पैसे खर्च केले आहेत त्यात अफरातफर आढळून येत आहे. हिशोबात ११० कोटींचा ठावठिकाणा लागत नाही. तसेच अनेक महत्वपूर्ण प्रश्न निर्माण झाले आहे. त्यांची उत्तरं शुभ्रांच्या चौकशीतून मिळतील, त्यांच्या चौकशीत दागिने खरेदी करताना ज्या पैशांचा हिशेब लागत नाही. त्याबाबत माहिती घेतली जाईल अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी पुढे दिली.
याआधी देखील ईडीने काही दिवसांपूर्वी शुभ्रा यांना नोटीस पाठवून सीजीओ कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्या गैरहजर राहिल्या. दरम्यान त्याआधी देखील ईडीने त्यांना चौकशीसाठी नोटीस धाडली त्यावेळी सर्वांच्या नजरा चुकवून बुरखा घालून शुभ्रा ईडी कार्यालयात पोचली होती. त्यावेळी त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली होती. रोज वॅली चिटफंड घोटाळ्याचा सूत्रधार गौतम कुंडूने लोकांना गंडा घालून हजारो कोटी लुबाडले असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या पैशाद्वारे गौतमने सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केली होती. या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी शुभ्रा यांचे पती गौतम कुंडू यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी ईडीने पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी गौतमविरोधात १७ हजार ५२० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा ठपका आहे.