कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमधून सिक्युरिटी गार्डनेच 20 लाख रुपयांची चोरी केल्याची घटना घडली. एटीएममधून रोकड चोरल्यानंतर सिक्युरिटी गार्डने तेथून पळ काढला. त्यानंतर तपास केल्यानंतर पोलिसांनी त्याला आसाममधून अटक करून रोख रक्कम जप्त केली. त्याच्याकडून पोलिसांना 14.2 लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. दीपांकर नामोसूद्र असे या सिक्युरिटी गार्डचे नाव आहे. विल्सन गार्डनच्या 13 क्रॉस परिसरात असलेल्या एटीएममध्ये तो 6 महिन्यांपूर्वी सिक्योरिटी गार्ड म्हणून रुजू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांशी सिक्युरिटी गार्डची मैत्री झाली होती. याचा फायदा घेत त्याने एटीएम मशिनमधील पैशांची कॅसेट उघडण्यासाठी वापरण्यात येणारा पासवर्डही शिकून घेतला होता. पासवर्ड कर्मचाऱ्यांच्या डायरीत डोकावून माहीत करून घेतला होता. यानंतर एटीएममधून पैसे चोरून आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्याचा प्लॅन होता. लग्नानंतर त्याला त्याच्या मूळ गावी करीमगंजमध्ये स्थायिक व्हायचे होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्युरिटी गार्डने 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.50 ते 8.20 च्या दरम्यान हा गुन्हा केला. त्याने एटीएम मशीनमधून पैसे चोरले आणि नंतर एटीएममध्ये कपडे बदलले. त्याची ही सर्व कृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याची त्याला कल्पना नव्हती. मात्र, त्याने कॅमेरा मागे वळवला आणि दिवेही बंद केल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी एटीएम मशिनमध्ये रोकड नसल्याचे आणि सिक्युरिटी गार्डही बेपत्ता असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
19.96 लाख रुपयांची चोरीया संपूर्ण घटनेनंतर बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक खुशबू शर्मा यांनी विल्सन गार्डन पोलिसात तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांनी सिक्युरिटी गार्ड नोमोसुद्रावर एटीएम मशीनमधून 19,96,600 रुपये चोरून फरार झाल्याचा आरोप केला. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आणि डीसीपी (मध्य) आर श्रीनिवास गौडा यांनी फरार सिक्युरिटी गार्डला पकडण्यासाठी निरीक्षक ए राजू यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार केली. पोलिसांचे विशेष पथक आसाममधील सिक्युरिटी गार्डच्या मूळ गावी पोहोचले आणि तेथे त्याला शोधून अटक केली. तसेच, या सिक्युरिटी गार्डने आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आणि आलिशान हॉटेलमध्ये राहण्यासाठी 5 लाख रुपये खर्च केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दिवे बंद करून केली चोरीआरोपी सिक्युरिटी गार्डने पोलिसांना सांगितले की, एटीएममधून पैसे चोरण्याचा त्याचा कोणताही विचार नव्हता. मात्र एटीएम मशिनमध्ये पैसे ठेवणाऱ्या कॅसेटचा पासवर्ड कळताच त्याने पैसे चोरण्याचा प्लॅन आखला. पोलिसांनी सांगितले की, सिक्योरिटी गार्ड आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. त्यामुळेच त्याला त्याच्या मैत्रिणीशी लग्न करण्यात अडचण येत होती. त्यामुळेच त्याने हा गुन्हा केला. या पैशातून घर बांधून हॉटेल उघडण्याची त्याची योजना होती, असे पोलिसांनी सांगितले. चोरी करताना एटीएम रूमचे दिवे बंद केले. त्यामुळे आपले हे कृत्य कॅमेऱ्यात कैद होणार नाही, असे सिक्युरिटी गार्डला वाटले होते, असेही पोलिसांनी सांगितले.