एआय इंजिनिअर अतुल सुभाष याने पत्नी आणि सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप करून आत्महत्या केली. त्याने दीड तासांचा एक व्हिडीओ आणि २४ पानांची सुसाईड नोट देखील लिहिली आहे. यामध्ये त्याने त्याच्या लग्नाच्या सुरुवातीपासून ते पत्नीशी झालेल्या वादापर्यंत, त्याच्यावरील प्रत्येक खटला आणि त्याला आत्महत्येकडे ढकलणारा प्रत्येक मुद्दा सविस्तरपणे सांगितला आहे.
सुसाईड नोटमध्ये स्वत:वरील आरोपाबाबत अतुलने लिहिलं - "माझ्यावरील हा आरोप खूपच हास्यास्पद आहे की, मी माझी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांकडून १० लाख रुपयांचा हुंडा मागितला होता. माझ्या पत्नीचा दावा आहे की, जेव्हा तिने घर सोडलं तेव्हा माझं वार्षिक उत्पन्न ४० लाख रुपये होतं आणि नंतर तिने सांगितलं की, मी वर्षाला ८० लाख रुपये कमावतो. ४० किंवा ८० लाख रुपये कमावणारी व्यक्ती १० लाख रुपयांची मागणी करेल आणि पत्नी आणि मुलांना सोडून देईल का?"
"माझ्या १० लाख रुपयांच्या मागणीमुळे तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला, असा आरोपही करण्यात आला आहे. तिने स्वत: उलट तपासणीत कबूल केलं की, तिचे वडील बऱ्याच दिवसांपासून अस्वस्थ होते. गेल्या १० वर्षांपासून ते एम्समध्ये हृदयविकार आणि मधुमेहावर उपचार घेत आहेत. पण माझ्यावर आणि माझ्या आई-वडिलांवर हत्येता आरोप केला होता" असंही अतुल सुभाषने म्हटलं.
अतुल सुभाषने ९ डिसेंबर रोजी बंगळुरूमध्ये त्याच्या बेडरूमच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या वेळी त्याने परिधान केलेल्या टी-शर्टवर Justice Is Due असं लिहिलं होतं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुमारे दीड तासांचा व्हिडीओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने कोणत्या परिस्थितीमुळे आत्महत्या करावी लागली याचा उल्लेख केला होता. यासाठी त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. याशिवाय त्याने जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशावरही गंभीर आरोप केले आहेत.
व्हिडिओमध्ये अतुलने आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीने त्याला त्याच्या साडेचार वर्षाच्या मुलाला भेटू दिलं नाही. आता मृत्यूपूर्वी अतुलने आपल्या मुलासाठी भेटवस्तू ठेवली आहे. मुलगा २०३८ मध्ये १८ वर्षांचा झाल्यावर ती भेटवस्तू उघडायची आहे. एवढंच नाही तर आपल्या पत्नीने मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करावे, जेणेकरून मुलाला चांगले संस्कार मिळतील, अशी आपली शेवटची इच्छा असल्याचं त्याने सांगितलं.