बंगळुरूमध्ये ३ आणि ४ सप्टेंबरच्या दरम्यान आरोपी मुक्ती रंजन रॉयने महालक्ष्मीची हत्या केली. मात्र त्या रात्री नेमकं काय घडलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबतची काही माहिती आता समोर आली आहे. एका मॉलमध्ये महालक्ष्मी आणि मुक्ती रंजनची भेट झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र जेव्हा मुक्ती रंजनची नजर महालक्ष्मीच्या मोबाईलवर पडली तेव्हा लव्हस्टोरीत ट्विस्ट आला.
महालक्ष्मीच्या मोबाईलमध्ये इतर अनेक लोकांसोबतचे तिचे फोटो होते. हे फोटो पाहून मुक्ती रंजनचं डोकं फिरलं. त्याने याबाबत तिला जाब विचारला असता तिने उडवाउडवीची उत्तर दिलं. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण ती त्याला सतत टाळत होती. ३ सप्टेंबरच्या रात्री अशाच काही कारणांमुळे दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. त्यावेळी मुक्ती रंजन महालक्ष्मीसोबत तिच्याच घरी होता. तो तिला लग्नासाठी समजवण्याचा प्रयत्न करत होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ आणि ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री महालक्ष्मी आणि मुक्ती रंजन यांच्यात महालक्ष्मीची वेगवेगळ्या लोकांशी असलेली मैत्री, लग्न, पैशाचे व्यवहार अशा अनेक मुद्द्यांवरून भांडण सुरू होतं. मात्र काही वेळातच महालक्ष्मीने मुक्ती रंजनवर हल्ला केला. मुक्ती रंजनने महालक्ष्मीला प्रत्युत्तर म्हणून मारलं. यानंतर त्याने रागाच्या भरात महालक्ष्मीचा गळा दाबून जीव घेतला.
३ सप्टेंबरच्या रात्री महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर मुक्ती रंजन रात्रभर तिच्या मृतदेहासोबत घरात बसून राहिला. रात्रभर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा तो विचार करत राहिला. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी मोठा चाकू खरेदी करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडला. मुक्ती रंजन घरातून बाहेर पडताना आणि नंतर चाकू विकत घेऊन परतत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रात्रभर अनेक व्हिडीओ पाहिल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मृतदेहाचे तुकडे करून ते महालक्ष्मीच्या घरात पडलेल्या सुटकेसमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावायची होती, पण पुढचा प्लॅन रद्द केला. मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवून त्याने महालक्ष्मीच्या घरातून पळ काढला. त्यानंतर आपल्या आईसमोर आणि भावासमोर त्याने हत्या केल्याची कबूली दिली आणि स्वत: आत्महत्या केली.