बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच आणखी एक घटना घडली आहे. एका फ्लॅटमध्ये महिलेच्या मृतदेहाचे ३० तुकडे सापडले आहेत. मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. महालक्ष्मी असं महिलेचं नाव आहे. महालक्ष्मी गेल्या ९ महिन्यांपासून पती हेमंत दासपासून वेगळी राहत होती. आता याप्रकरणी मृत महिलेचा पती हेमंत दास याने मोठा दावा केला.
अशरफ नावाच्या तरुणासोबत पत्नी रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले असं म्हटलं आहे. इंडिया टुडेशी बोलताना हेमंत दासने सांगितलं की, एक महिन्यापूर्वी तो आपल्या पत्नीला भेटला होता, जेव्हा तो त्याच्या मुलीला भेटायला आला होता. हेमंतने सांगितलं की, महालक्ष्मी काही महिन्यांपासून अशरफसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि ती त्याच्यासोबत फ्लॅटमध्ये राहत होती.
फ्लॅटमध्ये महालक्ष्मीचा मृतदेह ३० तुकड्यांमध्ये आढळून आला. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने महालक्ष्मीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं, तेव्हा सर्वजण हादरले. महालक्ष्मीची हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस जेव्हा फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांना तेथे एक बॅगही ठेवल्याचं आढळलं. महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोपीचा डाव असल्याचा पोलिसांना संशय आहे.
कोण आहे अशरफ?
अशरफ हा उत्तराखंडचा रहिवासी आहे. तो बंगळुरूमध्ये एका दुकानात काम करत होता. हेमंत दासने सांगितलं की, महालक्ष्मीसोबत त्याचं लग्न केवळ ६ महिने टिकलं. यानंतर दोघेही वेगळे राहू लागले. यानंतर महालक्ष्मीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि बंगळुरूला येणं बंद केलं. हेमंत दासने दावा केला की, त्याची पत्नी आणि अशरफ यांचे संबंध होते. अशरफनेच खून केल्याचा संशय हेमंतने व्यक्त केला.
पोलिसांनी काय सांगितलं?
महालक्ष्मी हत्येप्रकरणी बंगळुरूचे पोलीस आयुक्त दयानंद म्हणाले की, पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीची ओळख पटली असून त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देण्यास नकार दिला. आरोपी हा बाहेरचा असून त्याच्याबाबत आपण जास्त माहिती देऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.