बंगळुरूमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेच्या हत्येने एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत आता नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी मुक्ती रंजन रॉय याने ओडिशातील भद्रक जिल्ह्यात गळफास लावून आत्महत्या केली. भद्रकचे पोलीस अधीक्षक वरुण गुंटुपल्ली यांनी सांगितलं की, आरोपी भुईनपूर गावचा रहिवासी होता आणि पोलिसांनी घटनास्थळावरून एक डायरीही जप्त केली आहे, ज्यामध्ये मुक्ती रंजनने महिलेच्या हत्येची कबुली दिली आहे.
मृतदेहाचे केले ५० पेक्षा जास्त तुकडे
पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये मुक्ती रंजनने महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ५० पेक्षा जास्त तुकडे केल्याचं लिहिलं आहे. सुसाईड नोटचा संदर्भ देत बंगळुरू पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मुक्ती रंजन आणि महालक्ष्मी यांच्यात प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी मुक्ती रंजनवर लग्नासाठी दबाव टाकत होती, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती आणि त्यामुळेच आरोपीने तिची हत्या केली.
दोघांमध्ये वारंवार होत होती भांडणं
पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपी मुक्ती रंजन रॉयने लिहिलं आहे की, "मी महालक्ष्मीच्या वागण्याला कंटाळलो होतो. मी तिच्याशी वैयक्तिक कारणावरून भांडलो आणि हे भांडण रोज व्हायचं. महालक्ष्मीने माझ्यावर हल्ला केला, तिच्या या वागण्यामुळे रागावून महालक्ष्मीची हत्या केली." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ती रंजन रॉय यांनी सुसाईड नोट इंग्रजी आणि ओडिया भाषेत लिहिली होती. महालक्ष्मी मला किडनॅपिंग केसमध्ये अडकवण्याची धमकी देत असे. मी खूप पैसे खर्च केले असंही त्याने म्हटलं आहे.
कर्नाटक सरकारने बंगळुरू हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यासाठी आणि प्रकरणाची उकल करण्यासाठी एक पथक ओडिशात पाठवलं होतं. पोलिसांनी चार पथकं तिथे पाठवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वारंवार जागा बदलून पळून जात होता. बंगळुरूमधील मल्लेश्वरम भागातील एका इमारतीत महालक्ष्मीची हत्या करण्यात आली होती आणि तिच्या शरीराचे ५० हून अधिक तुकडे करण्यात आले होते, जे फ्रीजमधून जप्त करण्यात आले.