बंगळुरूमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेचा मृतदेह फ्रिजमध्ये ३० तुकड्यांमध्ये सापडला आहे. ही हत्या सुमारे २० दिवसांपूर्वी म्हणजेच २ ते ३ सप्टेंबर दरम्यान झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना मिळालेल्या महत्त्वाच्या पुराव्यानुसार, महालक्ष्मीच्या हत्येत अनोळखी व्यक्तीचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. एक मिस्ट्री मॅन महालक्ष्मीच्या घरी वारंवार येत असे.
महालक्ष्मीच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, ती लोकांमध्ये जास्त मिसळत नसायची. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र, शेजाऱ्यांनी एका अनोळखी व्यक्तीला महालक्ष्मीच्या घरी अनेकदा पाहिलं होतं. बंगळुरू पोलीस तो अनोळखी व्यक्ती, मिस्ट्री मॅन कोण? याचा शोध घेत आहेत. महालक्ष्मीची हत्या करणाराही तोच अनोळखी व्यक्ती असावा, अशी शक्यता आहे.
कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणी दिलेल्या विधानानुसार, महालक्ष्मीच्या हत्येशी संबंधित व्यक्तीचं पश्चिम बंगालशी कनेक्शन आहे. कारण गृहमंत्र्यांनी सांगितलं की, या प्रकरणात अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे, जी आत्तापर्यंत शेअर करता येणार नाही. जोपर्यंत अधिक माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही काहीही बोलू शकत नाही.
बंगळुरू पोलिसांचे म्हणणे आहे की, महालक्ष्मीच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून संशयाची सुई तिच्या घरी येणाऱ्या अनोळखी व्यक्तीकडे वळत होती. बंगळुरू पोलिसांचा दावा आहे की, त्यांच्याकडे त्या अनोळखी व्यक्तीची माहिती आहे. त्यांना त्याचं नावही माहीत आहे. महालक्ष्मीच्या हत्येनंतर तो भुवनेश्वरमार्गे पश्चिम बंगालला गेला होता, अशीही माहिती आहे. तो अलर्ट होऊ नये म्हणून पोलीस त्याचं नाव उघड करत नाहीत.
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
महिलेची आई मीना राणा यांनी सांगितलं की, हत्येची माहिती मिळण्याच्या एक दिवस आधी मुलगी राहत असलेल्या अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याचं समजलं. शनिवारी मी आणि लक्ष्मी घरी गेले असता दरवाजा बाहेरून बंद असल्याचं आढळून आलं. यानंतर दुसरी चावी घेऊन आम्ही अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. जेव्हा आम्ही घरात प्रवेश केला तेव्हा दिसलं की घर पूर्णपणे विखुरलेलं आहे. चप्पल, कपडे आणि सुटकेस लिव्हिंग रूममध्ये फेकून दिलं होतं. फ्रिजजवळ रक्ताचे डाग होते. फ्रिजजवळ किडेही दिसले. जेव्हा आम्ही फ्रिज उघडला तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला "