बंगळुरूमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षाच्या मुलाला त्याच्या वडिलांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा त्याच्या वडिलांकडे स्मार्टफोन दुरुस्त करून घेण्याचा हट्ट करत होता. याच दरम्यान दोघांमध्ये वादावादी झाली.
मुलाचे वडील इतके संतापले की, त्यांनी आधी त्याच्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला आणि नंतर त्याची मान पकडून भिंतीवर डोकं आपटलं. यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं.
पोलिस उपायुक्त (दक्षिण) लोकेश बी जगलासर यांनी सांगितलं की, मोबाईलच्या अतिवापरावरून मुलगा आणि त्याच्या पालकांमध्ये बरेच वाद होत होते. शिवाय, त्याचे आई-वडीलही तो नियमितपणे शाळेत जात नसल्यामुळे आणि वाईट मित्रांच्या संगतीवर नाराज होते.
मुलाच्या मृत्यूमागचं कारण हे त्याच्या वडिलांनी त्याला केलेली मारहाण हे आहे. त्याचा मोबाईल नीट चालत नसल्याने तो आई-वडिलांना फोन दुरुस्त करण्यास सांगत होता. यावेळी वादावादी होऊन वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केली.
अधिकाऱ्याने सांगितलं की, मारहाणीमुळे मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या पाठीवर आणि डोक्यावर अनेक जखमा आढळल्या. मुलावर हल्ला करणाऱ्या वडिलांना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत. वडील व्यवसायाने सुतार होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.