लखीमपूर – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीत एक धक्कादायक घटना घडली आहे, ऑनलाइन संपर्कात आलेल्या मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या युवकाला तिच्या कुटुंबांनी बेदम मारलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. एक मुस्लीम युवक बंगळुरूहून फ्लाइट पकडून एका हिंदू मुलीला भेटण्यासाठी यूपीत आला होता. या युवकाला मुलीच्या कुटुंबाने मारहाण करत पोलीस ठाण्यात घेऊन गेले, त्याठिकाणी रात्रभर युवकाला पोलिसांनी ताब्यात ठेवलं होतं.
स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रकरणी दबाव टाकून नव्या धर्म परिवर्तन कायद्यानुसार या युवकावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. पोलिसांनी युवकाला रविवारी ताब्यात घेतलं आणि सोमवारी त्याला जामिनावर सोडलं आहे. माहितीनुसार २१ वर्षाचा युवक बंगळुरू येथे इंजिनिअर आहे, मागील वर्षी एप्रिल महिन्यात तो लखीमपूर येथील अल्पवयीन मुलीच्या ऑनलाइन संपर्कात आला. मुलीचा वाढदिवस असल्याने तो बंगळुरूहून तिला भेटण्यासाठी यूपीला पोहचला.
यूपीत जाण्यासाठी युवकाने फ्लाइटचं बुकींग केले,त्याचसोबत सॉफ्ट टॉय, चॉकलेट आणि मिठाई घेऊन मुलीच्या घरी पोहचला, जेव्हा युवक मुलीच्या घरी दाखल झाला तेव्हा मुलीच्या घरच्यांना मुलगा मुस्लीम असल्याचं समजलं, त्यानंतर शेजारीही एकत्र झाले, हिंदू संघटनेचे लोकही हजर झाले. या लोकांनी मिळून युवकाला बेदम मारहाण केली, त्यानंतर पोलिसांनी फोन करून बोलवण्यात आले, या युवकावर धर्म परिवर्तन कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा अशी मागणी हिंदू संघटना करत आहेत.
याबाबत सदर कोतवाली पोलीस अधिकारी सुनील कुमार म्हणाले की, जेव्हा या युवकाला पोलीस ठाण्यात आणले तेव्हा त्याच्याकडून १५०० रुपये आणि तिकीट मिळालं, त्याने सांगितले तो देवरियाचा असून मुलीला भेटण्यासाठी यूपीला आलो होतो. मुलीच्या कुटुंबीयांना युवकापासून धोका आहे परंतु त्यांना तक्रार करायची नाही, मात्र हिंदू संघटना युवकावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करत आहेत. सोमवारी या युवकाला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र ऑनलाइन मुलीच्या संपर्कात येऊन तिला भेटण्यासाठी जाणं हे बंगळुरूच्या युवकाला चांगलेच महागात पडलं आहे.