बंगळुरू – एका ३५ वर्षीय युवकाने १५ मुलींसोबत लग्न केले हे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. स्वत:ला डॉक्टर, इंजिनिअर असल्याचे सांगून हा युवक मुलींना जाळ्यात ओढायचा. विशेष म्हणजे या युवकाने जितक्या मुलींशी लग्न केले त्या शिक्षित आणि स्वावलंबी होत्या. त्यात डॉक्टर आणि इंजिनिअर मुलींचाही समावेश आहे. कुणी सरकारी नोकरी करते तर कुणी मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पगारावर आहे. या युवकाला धड इंग्लिश बोलता येत नाही. जर बोलता आले असते तर यापेक्षाही जास्त मुलींना त्याने फसवले असते.
युवकाच्या १५ लग्नाची पोलखोल तेव्हा झाली ज्यावेळी एका महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दिली. या दोघांचे लग्न ५ महिन्यापूर्वी झाले होते. या प्रकरणी कर्नाटकच्या म्हैसूर शहर पोलिसांनी महेश केबी नायकला अटक केली आहे. महेशचे वय ३३ वर्ष आहे. २४ व्या वर्षापासून त्याने महिलांना जाळ्यात अडकवणे सुरू केले. २०१४ पासून २०२३ पर्यंत युवकाने १५ महिलांना फसवले आहे.
‘असा’ झाला खुलासा
महेशनं या वर्षी जानेवारीत म्हैसूरमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीशी लग्न केले. लग्नानंतर १-२ महिने सर्व सुरळीत सुरू होते. त्यानंतर महेशने या महिलेला पैशासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. या दोघांचे लग्न आंध्र प्रदेशातील एका शहरात धूम धडाक्यात झाले होते. मुलीच्या आई वडिलांकडून महेशने हुंडाही घेतला होता. महिला सुरुवातीला महेशला तिच्या कमाईचे पैसे देत होती. त्यानंतर महेशने तिच्यावर दबाव बनवण्यास सुरुवात केली. हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरहून पैसे आण असा दबाव महेश पत्नीवर टाकत होता. जेव्हा महिलेने नकार दिला तेव्हा महेशने तिचे दागिने आणि घरातील रोकड घेऊन पसार झाला.
पोलिसांनी केली अटक
महिलेच्या तक्रारीवरून तपास पथके तयार करण्यात आली. महेशच्या मोबाईलवर पाळत ठेवली गेली. तपासादरम्यान पोलिसांना १५ महिला सापडल्या. महेशनेही त्यांच्याशी लग्न केल्याचे या महिलांनी सांगितल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी त्याला तुमकूर येथून अटक करून म्हैसूरला आणले.
४ महिलांची मुले
महेशच्या प्रकरणातील तपासादरम्यान, त्याने ज्या १५ महिलांशी त्याने लग्न केले, त्यापैकी चार महिलांपासून त्याला मुले झाल्याचेही समोर आले. आणखी एका महिलेनेही आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत पोलिसांकडे धाव घेतली आहे. लग्नानंतर काही दिवस तो महिलांसोबत राहायचा आणि नंतर पळून जायचा.
...अन् महिलांना असं जाळ्यात अडकवायचा
महेशने महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी मॅट्रिमोनिअल साइट्सचा वापर केला. पोलिसांनी सांगितले की, बहुतेक वेळा तो स्वत:ला इंजिनियर किंवा डॉक्टर म्हणून सांगायचा. डॉक्टर असल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी महेशने तुमाकुरू येथे एक बनावट दवाखानाही सुरू केला. लोकांचा त्याच्यावर विश्वास बसावा यासाठी त्याने एक नर्स देखील ठेवली.
महेशचे इंग्रजी बोलणे ऐकून अनेक महिलांना त्याच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला. त्याच्या खराब भाषा शैलीमुळे अनेक महिला त्यांच्या बोलण्याला बळी पडल्या नाहीत. महेशनं ज्या महिलांसोबत लग्न केले त्यांना लग्नानंतर सोडले होते. धक्कादायक म्हणजे, बहुतेक महिला सुशिक्षित आणि व्यावसायिक आहेत. आर्थिक गरजांसाठी त्या महेशवर अवलंबून नव्हत्या. लाजेपोटी आणि बदनामीच्या भीतीने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतरही त्यांनी कधीही तक्रार दाखल केली नाही, असे पोलिसांनी सांगितले.