बंगळुरू येथील महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा मृतदेहाचे ३० हून अधिक तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवण्याने एकच खळबळ उडाली. महिला मल्लेश्वरम येथील फॅशन फॅक्टरीमध्ये टीम लीडर म्हणून काम करत होती. महिलेच्या आईने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. महिलेची आई मीना राणा यांनी सांगितलं की, हत्येची माहिती मिळण्याच्या एक दिवस आधी मुलगी राहत असलेल्या अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याचं समजलं.
मीना राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मी मुलीची प्रकृती जाणून घेण्यासाठी तिला भेटायला जात असे. याच दरम्यान, महालक्ष्मीच्या शेजाऱ्याने तिचा भाऊ उक्कम सिंह यांना घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिली. शुक्रवारी माझी मोठी मुलगी लक्ष्मी हिने मला शेजाऱ्याने दिलेल्या माहितीबद्दल सांगितलं. संध्याकाळचे ७ वाजले होते त्यामुळे आम्ही शनिवारी सकाळी तिच्या घरी जायचं ठरवलं."
"शनिवारी मी आणि लक्ष्मी घरी गेले असता दरवाजा बाहेरून बंद असल्याचं आढळून आलं. यानंतर दुसरी चावी घेऊन आम्ही अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. जेव्हा आम्ही अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना दिसलं की घर पूर्णपणे विखुरलेलं आहे आणि चप्पल, कपडे आणि सुटकेस लिव्हिंग रूममध्ये फेकून दिलं होतं. फ्रिजजवळ रक्ताचे डाग होते. तसेच फ्रिजजवळ काही किडेही दिसले."
"जेव्हा आम्ही फ्रिज उघडला तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला आणि त्यानंतर मी माझा जावई इमरानला माहिती देण्यासाठी बाहेर धावले. आम्ही तत्काळ पोलिसांना बोलावलं. महालक्ष्मीने २ सप्टेंबर रोजी फोनवर सांगितलं होतं की, ती लवकरच तिच्या पतीला भेटायला जाणार आहे. त्यानंतर माझं तिच्याशी बोलणं झालं नाही."
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
महालक्ष्मी गेल्या ९ महिन्यांपासून पती हेमंत दासपासून वेगळी राहत होती. आता याप्रकरणी मृत महिलेचा पती हेमंत दास याने मोठा दावा केला. अशरफ नावाच्या तरुणासोबत पत्नी रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले असं म्हटलं आहे. इंडिया टुडेशी बोलताना हेमंत दासने सांगितलं की, एक महिन्यापूर्वी तो आपल्या पत्नीला भेटला होता, जेव्हा तो त्याच्या मुलीला भेटायला आला होता.