Mahalaxmi bangalore murder case : बंगळुरूमध्ये श्रद्धा वाळकर हत्याकांडासारखी घटना घडली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. २९ वर्षीय महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. फ्रीजच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात पाय होते, तर सगळ्यात खालच्या कप्प्यात मुंडकं. दरदरून घाम फोडणारे हे दृश्य बघितल्यावर घर मालकालाच नाही, तर पोलिसांनाही घाम फुटला. ही घटना कशी उघडकीस आली, याबद्दल पोलिसांनी माहिती दिलीये.
बंगळुरूमधील ज्या भागात ही घटना घडली आहे, त्या परिसराचे नाव आहे व्यालिकावल. शनिवारी हे हत्याकांड उजेडात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासाप्रमाणे महालक्ष्मीची हत्या चार ते पाच दिवसांपूर्वीच करण्यात आली असावी.
शेजाऱ्यांना सहन होईल वास, घर मालकाने तोडला दरवाजा अन्...
तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २९ वर्षीय महालक्ष्मी राहत होती. पोलिसांच्या माहितीप्रमाणे ती झारखंडमधील असून, तिचा विवाह हेमंत दास नावाच्या व्यक्तीसोबत झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. दोघांचे पटत नसल्याने ती वेगळी राहत होती. हेमंत दास मुलीला घेऊन तिला भेटायला येत असे.
महालक्ष्मीच्या घरातून दोन दिवसांपासून सडका वास यायला लागला होता. पण, शनिवारी वास सहन होईना झाल्यानंतर शेजाऱ्यांनी घरमालकाला याबद्दल सांगितले. घरमालक जयराम हे पहिल्या मजल्यावर गेले. महालक्ष्मीच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद होता.
त्यामुळे त्यांनी तो तोडला. घर उघडताच जास्त वास यायला लागला. फरशी चिकट झालेली होती. ते फ्रीजजवळ गेले आणि दरवाजा उघडला. थिजलेले रक्त आणि मानवी मृतदेहाचे कापलले अवयव बघून ते हादरलेच. त्यांनी तातडीने याची माहिती व्यापिकावल पोलीस ठाण्यात दिली.
अवयव ओळखण्यासाठी शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांची मदत
पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक सायन्सच्या पथकाला बोलवण्यात आले. पोलिसांनी फ्रीज उघडला तेव्हा सर्वात वरच्या कप्प्यात कापलेले पाय ठेवलेले आढळून आले. मधल्या कप्प्यांमध्ये शरीराचे इतर अवयव ठेवलेले होते, तर सर्वात खालच्या कप्प्यात महिलेचे मुंडके ठेवलेले आढळून आले.
महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याने त्याची जुळवाजुळव करणे पोलीस आणि फॉरेन्सिक सायन्सच्या पथकालाही अवघड झाले. त्यामुळे रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
महालक्ष्मीची हत्या कुणी केली?
मयत महालक्ष्मी पतीपासून वेगळी राहत होती आणि एक मोठ्या मॉलमध्ये कामाला होती. ती सकाळी ९.३० वाजता घरातून बाहेर पडायची आणि रात्री १०.३० वाजता घरी याचची. एक व्यक्ती तिला घ्यायला आणि सोडायला यायचा अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. त्या व्यक्तीचाही पोलीस शोध घेत असून, महालक्ष्मीचा पती हेमंत दास याचीही चौकशी पोलिसांनी केली आहे.