बंगळुरू - दिल्लीच्या श्रद्धा वाकरची हत्या अजूनही लोक विसरले नाहीत. २७ वर्षीय श्रद्धाला तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालानं १८ मे २०२२ रोजी ठार केले. त्यानंतर आरोपीने श्रद्धाच्या मृतदेहाचे ज्यारितीने तुकडे केले त्यामुळे पोलिसांसह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. आता त्याचप्रकारे बंगळुरू इथं हत्येचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे जे ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल.
बंगळुरूचा व्यालीकवल परिसर, ६ क्रॉस पाइप लाईन रोडवर एक तीन मजली इमारत...आणि याच इमारतीच्या खोलीत ठेवला होता १६५ लीटरचा सिंगल डोअर फ्रीज...यातच १९ दिवस २९ वर्षीय महालक्ष्मीच्या मृतदेहाचे जवळपास ३०-४० तुकडे लपवले होते. अनेक तुकडे फ्रीजबाहेर खोलीत पडले होते. याआधी कधीही हादरवणारे चित्र पोलिसांनीही पाहिले नसतील. सुरुवातीला पोलिसांनी या खोलीत जाण्याऐवजी बाहेर निघून गेले. खोलीत तुकड्याच्या रुपाने पुरावे विखुरलेले होते. बंगळुरू फॉरेन्सिक टीमलाही हे तुकडे गोळा करण्यासाठी सरकारी हॉस्पिटलमधील मेडिकल स्टाफला बोलवावं लागलं.
५ महिने भाड्याने राहत होती महालक्ष्मी
१९ दिवसांनी या खोलीचा दरवाजा मागील शनिवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजता उघडला. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महालक्ष्मी भाड्याने राहत होती. नेपाळची रहिवासी असलेली महालक्ष्मी एकटीच राहत होती. शेजारीही तिला ओळखत नव्हते. ती दररोज सकाळी साडे नऊ वाजता घरातून बाहेर पडायची आणि रात्री उशिरा घरी परतायची. महालक्ष्मीची आई, बहीण बंगळुरू इथं राहतात. २ सप्टेंबरपासून अचानक महालक्ष्मीचा फोन बंद झाला. आई, बहीण सातत्याने तिला फोन करायचे आणि संपर्क होत नव्हता.
दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी केली तक्रार
२० सप्टेंबरला काही शेजाऱ्यांनी इमारतीच्या मालकाला तक्रार करत बंद पडलेल्या महालक्ष्मीच्या घरातून खूप दुर्गंध येत असल्याचं सांगितले. भाडे करारात महालक्ष्मीनं बंगळुरात राहणाऱ्या आई आणि बहिणीचा पत्ता आणि संपर्क दिला होता. मालकाने महालक्ष्मीच्या आईला फोन केला आणि ही बाब कळवली. १९ दिवस महालक्ष्मीशी आईचं बोलणं झालं नव्हते. मालकाच्या फोननंतर आई घाबरली. तिच्याकडे महालक्ष्मीच्या घराची एक चावी होती. ती तातडीने दुसऱ्या मुलीसह महालक्ष्मीच्या घरी पोहचली.
जमिनीवर रक्त अन् मृतदेहाचे तुकडे
मालक, शेजारी यांच्या उपस्थितीत आईने घरचा दरवाजा उघडला तेव्हा इतक्या उग्र प्रमाणात आलेल्या दुर्गंधीमुळे सगळे मागे झाले. त्यानंतर काहींनी हिंमत करून घरात प्रवेश केला तेव्हा जमिनीवर रक्त आणि मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे पडल्याचं पाहून धक्का बसला. रक्ताचे काही डाग खोलीतील फ्रिजपर्यंत होते. फ्रिजचा दरवाजा उघडताच मोठी किंकाळी ऐकायला आली आणि सगळेच त्यादिशेने धावले. फ्रीजमधील दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. या फ्रिजमध्ये महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे करून ठेवले होते, पोलीस सध्या या घटनेचा शोध घेत आहेत.