बंगळुरु – सोशल मीडियावर स्वत:ला लेस्बियन असल्याचं सांगत ४० मुलींना फसवणाऱ्या बीएससीच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २१ वर्षीय या मुलानं मुलींना मॉडेल बनवण्याचं स्वप्न दाखवत सुरुवातीला त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर या मुलींकडून न्यूड फोटो घेत त्यांना ब्लॅकमेल करण्याचं कृत्य युवकाने केले. एका मुलीच्या तक्रारीवरुन युवकाचा भांडाफोड झाला आणि अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
BSC च्या अखेरच्या वर्षात शिकणाऱ्या या युवकाला पोलिसांनी अटक केली. हा युवक कर्नाटकातील कोडुगु जिल्ह्यातील राहणारा असून नाचप्पा असं त्याचे नाव आहे. बानसवाडी येथील एका कॉलेजमध्ये तो बीएससीच्या अखेरच्या वर्गात शिकतो. पोलिसांनी जेव्हा या मुलाचा तपास सुरु केला तेव्हा त्यांना धक्कादायक खुलासे कळाले. प्राथमिक चौकशीत कळालं की, मागील वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने इन्स्टाग्रामवर फेक मुलीच्या नावानं बनावट आयडी बनवलं. त्यानंतर आतापर्यंत त्याने जवळपास ३०-४० मुलींना फसवलं आणि पैशांसाठी मुलींना ब्लॅकमेल केले.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपीने आतापर्यंत पीडित मुलींकडून कमीत कमी २ लाखांपर्यंत वसुली केली आहे. आता अटकेत असलेल्या आरोपीची चौकशी करुन पोलीस आणखी किती मुलींना फसवलं त्याचा तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने सर्वात आधी बनावट आयडी बनवत मुलींना फॉलो करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवायचा. त्यानंतर तो एक लेस्बियन मुलगी असल्याचं सांगायचा. त्याचसोबत तो मॉडेलिंग फिल्ड असल्याचं सांगत मुलींना मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मदत करण्याचं खोटं सांगत समोरच्या मुलीला जाळ्यात उतरवायचा.
मॉडेल बनवण्यासाठी न्यूड फोटो घ्यायचा
आरोपी मॉडेल बनवण्याच्या नावाखाली मुलींकडून न्यूड फोटो घेत होता. त्यासाठी तो मुलींना सुरुवातीला ४ हजार रुपये द्यायचा. एकदा फोटो मिळाल्यानंतर तो मुलींना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैशांची वसुली करायचा. मागील नोव्हेंबर महिन्यात एका पीडितेने अलसूर गेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरु झाला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरु केले. त्यानंतर अनेक आठवड्यांनी ऑनलाईन सापळा रचत पोलिसांनी आरोपीला शिताफीने जाळ्यात ओढत त्याला बेड्या ठोकल्या.