लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चिराबाजार येथे बसच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या आरोपातून बेस्ट बसचालकाची तब्बल २७ वर्षांनंतर निर्दोष सुटका करण्यात आली. बसचालकाने बेदरकार व निष्काळजीपणे गाडी चालविल्याचे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने बसचालकाची निर्दोष सुटका केली.
या घटनेमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, यात शंका नाही. मात्र, बसचालकाने गाडी बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे चालविल्याचा पुरावा नसताना ठोठावलेली शिक्षा योग्य नाही. उलट बसचालकाने पीडित व्यक्तीला स्वत:हून रुग्णालयात नेले, असे न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने म्हटले. पीडित व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या भावनेच्या भरात दंडाधिकारी न्यायालय व सत्र न्यायालयाने बसचालकाला शिक्षा ठोठावल्याचे दिसते, असे न्यायालयाने नमूद केले.
जामिनावर झाली होती सुटका
बसचालकाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालविल्याचे सिद्ध करण्यास सरकारी वकील अपयशी ठरले, असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने अर्जदाराची शिक्षा रद्द केली. २००१ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने अर्जदाराला तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली होती. २००२ मध्ये सत्र न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांचा निर्णय योग्य ठरविला. अर्जदार दोन महिने कारागृहात राहिला आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.