नवी दिल्ली - लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हार्ट स्पेशलिस्ट ड़ॉक्टरला दुसरं लग्न करणं चांगलंच महागात पडलं आहे. 70 व्या वर्षी डॉक्टर दुसरं लग्न करायला जात होता पण याच नादात तब्बल 1 कोटी 80 लाख गमावले आहेत. ज्या महिलेसोबत डॉक्टर लग्न करणार होता त्या महिलेने त्याला कोट्यवधी रुपयांना फसवलं आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डॉक्टरने पोलिसात धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये राहणारे 70 वर्षीय डॉक्टर हे हार्ट स्पेशलिस्ट असून एका मोठ्या रुग्णालयात काम करतात.
तीन वर्षांपूर्वी डॉक्टरच्या पत्नीचं निधन झालं. यानंतर त्यांना एकटं वाटू लागलं. म्हणून त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी जानेवारीमध्ये एका वृत्तपत्रात जाहिरात देखील दिली. पीडित डॉक्टरांनी आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी जाहिरात दिल्यावर अनेक प्रपोजल आले. पण त्यांनी 40 वर्षीय कृशा शर्मा या महिलेला पसंत केलं. महिलेसोबत कॉल आणि मेसेजवर बोलणं सुरू झालं. तेव्हा तिने ती मरीन इंजिनिअर असल्याचं सांगितलं. यासोबतच फ्लोरिडामध्ये राहत असल्याची देखील माहिती दिली.
कृशाने डॉक्टरांना नोकरी सोडून आता बिझनेस करण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली. नोकरी करताना तिने सर्व सोनं हे आफ्रिकेहून खरेदी केलं आणि आता तिला ते भारताला पाठवायचं आहे. आपल्यासोबत एवढं सोनं घेऊन येण्यात धोका असल्याचं सांगितलं. त्यामुळे रॉयल सिक्योरिटी कंपनीमार्फत सोनं पाठवत असल्याचं सांगितलं. डॉक्टरांना ते रिसीव्ह करायला सांगितलं. त्यानंतर कुरिअर कंपनीकडून ड़ॉक्टरांना एक फोन आला.
कस्टम ड्यूटी आणि परमिशन फीच्या नावाने डॉक्टरकडे 1 कोटी 80 लाख मागितले. डॉक्टरने देखील ते पैसे दिले. यानंतर कृशाला कॉल केला असता तिचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. ज्यानंतर डॉक्टरांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं. एडीसीपी राघवेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.