लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोविड काळात बेस्टने वाढीव वीज बिल आकारल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्ट विरोधात आंदोलन केले होते. या प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले असून नार्वेकर, आमदार अतुल शहा यांच्यासह १६ जण सोमवारी कोर्टात हजर झाले होते. न्यायालयाने साक्षीदारांची यादी जाहीर करण्याचे आदेश तपास यंत्रणेला दिले.
कोविडच्या महामारीत अनेकांना नोकरी, व्यवसायपासून मुकावे लागले. पोटाची खळगी भरण्याचे वांदे असतानाच बेस्ट प्रशासनाने भरमसाठ बिले ग्राहकांना पाठवली त्याविरोधात भाजपने बेस्ट विरोधात आंदोलन केले होते इतकेच नव्हे तर बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेरण्याचा प्रयत्न देखील केला. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आमदार अतुल शहा व अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वांवर आरोप निश्चिती करण्यात आली असली तरी संबंधितांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या समोर सोमवारी सुनावणी घेण्यात आली त्यावेळी सीआरपी २९४ नुसार आंदोलन, घटना याबाबत अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. पेन ड्राइव्हच्या माध्यमातून हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. राहुल नार्वेकर यांचे वकील संदीप केकाने यांनी हा पुरावा, प्रत आरोपींना मिळावी अशी मागणी केली तर न्यायालयाने आरोपींची यादी सादर करण्याचे आदेश तपास यंत्रणेला दिले. युक्तिवादानंतर न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी १० नोव्हेंबर पर्यंत तहकूब केली.