अँटिलिया प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर दररोज नवनवीन महत्त्वाचे खुलासे होत आहेत. आरोपपत्रानुसार, मुख्य आरोपी सचिन वाजे याने मनसुख हिरेनला मारण्यासाठी मुंबई पोलिस दलातील माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मोठी रक्कम दिली होती. त्यानंतर प्रदीप शर्माने त्याचा साथीदार संतोषसह मनसुखची हत्या घडवून आणली होती. नंतर त्याचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला.या हायप्रोफाईल प्रकरणाच्या आरोपपत्रानुसार ३ मार्च रोजी सचिन वाजे यांनी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत मिटिंग केली. याच मिटिंगमध्ये वाजे याने पैशांनी भरलेली बॅग प्रदीप शर्माला दिली. ज्यामध्ये नोटांचे गठ्ठे भरले होते. पैसे मिळाल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलार याच्याशी संपर्क साधला होता आणि एका वाहनाबद्दल बोलले होते, ज्याचा वापर मनसुख हिरेनच्या हत्येसाठी आणि त्याच वाहनातून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केला जाणार होता.
मनसुख हिरेनच्या हत्येचा कट शिजल्यानंतर बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी मनसुख हिरेनचे अपहरण केले होते आणि नंतर त्याला संतोष शेलारच्या स्वाधीन केले होते. संतोष त्याचे साथीदार सतीश मोथुकरी, आनंद जाधव आणि मनीष सोनी यांच्यासह वाहनात उपस्थित होते. त्याचवेळी मनसुख हिरेनचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर चार आरोपींनी मनसुख हिरेनचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकून देत विल्हेवाट लागली.सचिन वाजेचा कट होता की, अँटिलियाजवळ जिलेटिनने भरलेली कार पार्क करण्याची जबाबदारी मनसुख हिरेन घेणार होता. पण ते घडले नाही. मनसुख हिरेन यांनी हा आरोप आपल्या अंगावर घेण्यास नकार दिला. मग सचिन वाजेने त्याला या प्रकरणातून हटवण्यासाठी नवा कट आखला आणि या कटाची जबाबदारी माजी चकमकफेम प्रदीप शर्मा याच्याकडे सोपवली.पोलिसांनी 5 मार्च रोजी मुंब्रा खाडीतून मनसुख हिरेनचा मृतदेह बाहेर काढला. पूर्वी हे प्रकरण आत्महत्या असल्याचे सांगितले जात होते. पण नंतर हे प्रकरण उघड झाले. एनआयएने या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी रियाझुद्दीन काझी, निरीक्षक सुनील माने, दोषी कॉन्स्टेबल विनायक शिंदे, आनंद जाधव, सतीश मोथकुरी, क्रिकेट बुकी नरेश गौर, संतोष शेलार आणि मनीष सोनी यांच्यासह सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा यांच्यावरही आरोप केले आहेत.