नागपूर : गुन्हे शाखेने लकडगंज आणि पारडीत छापे मारून साडेपाच कोटींची सडकी सुपारी जप्त केल्याने, सुपारीवाल्यांच्या घशात सुपारी अडकल्यासारखी झाली आहे. त्यामुळे लकडगंज, कळमनासह ठिकठिकाणच्या सुपारीच्या भट्ट्या अन् गोदामे दोन दिवसांपासून शटरबंद झाली आहेत.
आरोग्याला घातक असलेल्या सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून, ती नागरिकांच्या घशात घालणाऱ्या सुपारीवाल्या समाजकंटकांवर गुन्हे शाखेने गुरुवारी आणि शुक्रवारी छापे घातले. लकडगंजमध्ये अनुपकुमार नगरिया (वय ४५, सूर्यनगर) याच्या गोदामातून ८४ लाखांची सडकी सुपारी जप्त करून, नगरिया, तसेच गब्बरसिंग रणजीतसिंग लोधी (२५, बंदरी मालढम, सागर, मध्य प्रदेश) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर कापसी खुर्द (पारडी) येथील गृहलक्ष्मी सोसायटीतील गोदामावर शुक्रवारी पोलिसांनी छापा घातला. तेथे ४ कोटी ६० लाखांची सडकी सुपारी पोलिसांनी जप्त केली. हे गोदामही अनुप महेशचंद नगरिया याच्या मालकीचे आहे. त्यामुळे या गुन्ह्यातही नगरिया, त्याचा व्यवस्थापक अमित ग्यानचंद थारवानी आणि गोदामाचा चाैकीदार सुरेश रामप्रसाद सोनकुसरे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून, जप्त सुपारी, तसेच उपरोक्त आरोपींना एफडीएच्या हवाली करण्यात आले. या कारवाईमुळे सुपारीवाल्यांंमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. कारवाईच्या धाकामुळे त्यांनी कळमना, पारडी, कापसी, शांतीनगर, यशोधरानगर आणि सर्वांत मोठे हब असलेले लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदामाचे, तसेच भट्टीचे शटर दोन दिवसांपासून बंद ठेवले आहे. विशेष म्हणजे, या तस्करांशी जुळलेले दलाल पोलीस, एफडीएच्या नावाने महिन्याला विशिष्ट रक्कम जमा करतात. त्याची वसुलीही याच नेटवर्कमधील वेंसानी, तसेच अन्य काहीजण करतात. कारवाईनंतर तस्करांनी दलालांनाही कामी लावल्याने त्यांची धावपळ वाढली आहे.
तस्करांचे नेटवर्क अन् टोपणनावेसुपारीच्या नेटवर्कमधील बहुतांश तस्कर टोपणनावाने वावरतात. त्यातील राहुल, राजू अण्णा, टिनू, आनंद, पंचमतिया, अनिल, आसिफ कलिवाला, बंटी, गनी खान, जतीन-हितेश, कॅप्टन, मोर्या, हारू, रवी, संजय आनंद, पाटना, इर्शाद, गनी, चारमिनार, बंटी आणि संजय यांचे लागेबांधे नागपूर-महाराष्ट्रच नव्हे, तर आजूबाजूच्या प्रांतासह श्रीलंका, इंडोनेशिया आणि सुपारी उत्पादक अन्य काही देशांतही असल्याचे सांगितले जाते.