सूर्यकांत वाघमारे - नवी मुंबई - आयपीएलच्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या आठ जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी रात्री नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी संबंधितांनी बनावट कागदपत्रांद्वारे घेतलेले सिमकार्ड वापरल्याचे समोर आले आहे. त्यानुसार संबंधितांवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्ध पंजाब किंग्स क्रिकेटचे सामने खेळले जात होते. यावेळी स्टेडियममध्येच उपस्थित असलेले काहीजण ऑनलाईन सट्टा चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, उपनिरीक्षक संजय रेड्डी आदींचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्टेडियममध्ये पाहणी केली असता, एका ठिकाणी मोबाईलवर सट्टा सुरू असल्याचे दिसून आले. त्यानुसार सापळा रचून संबंधित आठही जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
राजूकमार श्रीवास्तव,अमीर अली, प्रशांत हेडावू, अजय दबगर, हार्दिक बारोत, संदीप धनपाल, तिरुमला बाबू व सीमा रविशंकर, अशी त्यांची नावे आहेत. अधिक चौकशीत त्यांनी स्वतसह इतरांकडून ऑनलाईन सट्टा लावून घेतला असल्याचे कबूल केले. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमकार्ड बाबत पोलिसांनी चौकशी केली असता, ते सिमकार्ड वेगळ्याच व्यक्तींच्या नावे असल्याचे उघड झाले. त्याबाबत अधिक चौकशीत त्यांनी अज्ञात व्यक्तीची कागदपत्रे मिळवून काही बनावट कागदपत्रे तयार करून सिमकार्ड घेतले असल्याचे उघड झाले. त्यानुसार आठही जणांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.