अलिबाग - मेंढा झुंज, बैलांची झुंज यावर सट्टा लावण्याच्या घटना कुठेना कुठे होत असतात. रायगड जिल्ह्यात खोपोली मध्ये कोंबड्याची झुंज लावून त्यावर सट्टा लावणाऱ्या ३४ जणांवर जेलची हवा खाण्याची वेळ आलेली आहे. खोपोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ३४ जणासह ७१ लाख ७८ हजार १९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खोपोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंबड्याची झुंज लावून सट्टा लावण्याची पहिलीच घटना आहे.
खोपोली पोलीस ठाणे हद्दीत गगनगिरी नगर येथे तेज फार्म आहे. तेज फार्म हाऊसवर कोंबड्याची झुंज लावून सट्टा लावत असल्याची माहिती गुप्त माहितीदार यांच्याकडून पोलीस अधीक्षक याना मिळाली होती. त्यानुसार खोपोली पोलिसांना पोलीस अधीक्षक यांनी छापा टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार खोपोली पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले. शुक्रवारी ४ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास पथकाने तेज फार्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी कोंबड्याच्या पायाला धारदार हत्यार लावून आपापसात झुंज लावून त्यावर उपस्थित पैसे लावून जुगार खेळत होते.
खोपोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ३४ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून ४ लाख ३१ हजार १९५ रुपये रोख रक्कम, १८ हजार ७०० रुपयाची अवैध दारू, ६६ लाख ९० हजाराची २४ वाहने, ३६ झुंजीच्या कोंबड्या असा ७१ लाख ७८ हजार १९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोंबड्याची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले जाणार आहे. तेज फार्म हाऊस बाबत अधिक माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माहिती दिली आहे.