नागपूर : ‘आयपीएल’ स्पर्धेच्या सामन्यांवर सट्टा चालविणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. शहरातील लहान वस्त्यांमध्ये असे प्रकार सुरू असल्याचा संशय असून पोलिसांकडून येत्या दिवसांत कारवाई वाढण्याची शक्यता आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
भगवानननगर येथील प्लॉट क्रमांक ८ येथील रहिवासी नितेश किशोर चौधरी हा त्याच्या घरी सट्टाअड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांनी खबऱ्यांच्या मार्फत मिळाली. पोलिसांनी त्याची खातरजमा केली व सापळा रचला. मंगळवारी रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जदरम्यान सामना सुरू होता. पोलिसांनी रात्री १० च्या सुमारास नितेशच्या घरी धाड टाकली असता तेथे तो सामन्यावर पैसे स्वीकारून फोनच्या माध्यमातून लगवाडी-खायवाडी करत होता.
पोलिसांनी त्याला अटक केली व त्याच्या घरातून मल्टीमॉडेल मोबाईल्स, सट्टा लाईनचे मोबाईल, टीव्ही, सेटटॉप बॉक्स व रोख सहा हजार असा सुमारे ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडून सामन्याच्या सट्ट्याचे सौदे असलेले कागददेखील ताब्यात घेण्यात आले. युनिट क्रमांक तीनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन भोंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अजनी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.