लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मध्यप्रदेशातील बैतुलच्या एका अभियंत्याला कारचे मडगार्ड चोरून नेणे चांगलेच महागात पडले. नंदनवन पोलिसांनी त्याला त्याच्या गुन्हेगार साथीदारासह अटक केली. मेहूल सुनील राठोड (वय २९, रा. पॉवर ग्रीड चाैक) असे त्याचे तर मुकेश अशोककुमार बेरी (वय २८, जुना सुभेदार लेआऊट) असे साथीदाराचे नाव आहे. मेहूल अभियंता तर मुकेश गुन्हेगार आहे. हे दोघेही मित्र आहेत. तीन महिन्यांपूर्वी मेहूलने महागडी कार विकत घेतली होती. कारचे मडगार्ड तुटल्याने त्याने १५ एप्रिलला नंदनवनमधील नीलम दीपक साखरकर यांच्या कारचे मडगार्ड तसेच नेमप्लेट चोरून नेली. साखरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून नंदनवन पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या चोरीचा छडा लावला. सीसीटीव्हीत चोरीच्या ठिकाणावरून निघालेली कार मेहूलच्या पॉवर ग्रीड चाैकाजवळ उद्धव अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आढळली. त्यामुळे पोलिसांनी मेहूलच्या कारची तपासणी केली. यावेळी साखरकर यांची नेमप्लेट मेहूलच्या कारमध्ये तुटलेल्या अवस्थेत दिसली. परिणामी पोलिसांनी मेहूलला आणि त्याच्या माहितीवरून मुकेशला अटक केली. या दोघांनी चोरीची कबुली दिली. दारूच्या नशेत ही चोरी केल्याचे सांगून तो पोलिसांकडे कारवाई न करण्याची विनंती करू लागला. मात्र, चोरीचे प्रकरण आणि सीसीटीव्ही फुटेजचा भक्कम पुरावा असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून २५ हजार किमतीचे मडगार्डही जप्त करण्यात आले. नंदनवनचे ठाणेदार मुख्तार शेख, हवालदार संजय साहू तसेच कर्मचारी भीमराव ठोंबरे, विनोद झिंगरे, संदीप गवळी, राजेश बंसोडे आणि प्रेम खैरकर यांनी ही कारवाई केली.