नवी दिल्ली-
दिल्ली पोलिसांनी चीनी ठगांना भारतीय नागरिकांच्या बँकेचे डिटेल्स देऊन कमीशन घेणाऱ्या एका गँगचा पर्दाफाश केला आहे. या गँगमधील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. रवी कुमार, जावेद अन्सारी आणि विकास यादव अशी अटक करण्यात तीन आरोपींची नावं आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार गँगचा म्होरक्या अजूनही फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांना २२ मे रोजी एका महिलेची फसवणुक करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदार महिलेच्या माहितीनुसार तिला पैशांची गरज होती. त्यामुळे तिनं प्ले-स्टोअरवरुन मॅजिक मनी नावाचं अॅप डाऊनलोड केलं होतं. यातून तिनं ६५ हजार रुपयांचं कर्ज घेतलं आणि कर्जाची परतफेड देखील वेळेत केली. तरीही कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून तिला फोन येऊ लागले. हे एजंट आक्षेपार्ह भाषेत तिच्याशी बोलत होते आणि पुन्हा कर्जाची परतफेड करण्याची धमकी देत होते.
पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आणि चौकशीला सुरुवात केली. संबंधित महिलेच्या बँक खात्याशी निगडीत मोबाइल क्रमांकाचा सीडीआर देखील पोलिसांनी मिळवला आणि त्याची चौकशी केली. कॉल डिटेल्सच्या आधारावर संशयित क्रमांकाशी निगडीत इतर बँक खात्यांची माहिती मिळवण्यात आली. फसवणूक करणाऱ्या टोळक्यांनी एका कंपनीचे कादगपत्र डाऊनलोड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कंपनीचं नाव मेसर्स टॉवियर अपॅरल प्रायव्हेट लिमीटेड असं होतं. ही कंपनी नोएडास्थित असल्याचं दाखवत होतं. या कंपनीचं नाव वापरुन पेमेंट गेटवे/अॅग्रीगेटर पेटीएमवर एक ऑनलाइन खातं उघडण्यात आलं होतं.
खात्यात तब्बल २० कोटी रुपये!पोलिसांनी याप्रकरणी राजस्थानच्या झालवाड येथील रहिवासी रवी कुमार पंकज याला अटक केली. ज्याचं खातं तपासलं असता धक्कादायक माहिती समोर आली. याच्या खात्यात एकाच दिवशी तब्बल १९.४३ कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. रवी कुमार पंकजने चौकशीत खुलासा केला की त्यानं राजस्थानच्या झालावाडा येथील मनीष मेहरायाला १५ हजार रुपये प्रति बँक खात्याच्या हिशोबानं आपलं आणि आणखी चार बँक खाती विकली होती. मनीष मेहरा यानं हीच बँक खाती जावेद राजा अन्सारी याला विकली होती. टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून यासाठी संपर्क साधण्यात आला होता.
दीड लाख रुपयांसाठी बँक खात्याची माहिती विकलीआरोपी जावेद रजा अन्सारी यानं दिलेल्या माहितीनुसार त्यानं बँक खात्यांची संपूर्ण माहिती एका मलेशियन नागरिकाला विकली होती. बचत खात्याच्या माहितीसाठी प्रति खात्यामागे ३० हजार रुपये आणि चालू खात्याच्या माहितीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये मिळाले होते. तसंच ICICI बँकेच्या चालू खात्यांची माहिती देण्यासाठी प्रत्येक खात्यामागे १ लाख ते दीड लाख रुपये मिळाले होते. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार प्ले स्टोअरवर कर्ज देणारी अनेक चीनी संचालित अॅप्स आहेत.
७ दिवसांमध्ये व्याज वाढतंमोबाइल अॅपच्या माध्यमातून लोकांना तत्काळ कर्ज उपलब्ध करुन दिल्याचं आमीष यातून दिलं जातं. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून युझरच्या वैयक्तिक माहितीची चोरी केली जाते. कर्ज उपलब्ध करुन दिल्यानंतर एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम अर्ज शुल्काचं कारण देऊन कापली जाते आणि उर्वरित राशीची परतफेड ७ दिवसांत केली नाही. तर व्याजदर वाढवला जातो. इतकंच नव्हे, तर दंडासोबत उधार राशी थेट २०० टक्क्यांनी परत करावी लागते. जर परतफेड केली नाही तर नेपाळ सारख्या शेजारील देशातून चालवल्या जात असलेल्या कॉल सेंटर्सकडून संबंधित व्यक्तीचा डेटा लिक करण्याची धमकी दिली जाते.