मुंबई : कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिविर, टोसिलीझुमॅबच्या निमित्ताने फसव्या जाहिराती देऊन फसवणुकीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी फेसबुकसह विविध समाज माध्यमांवर येणाऱ्या जाहिरातींवरील आमिषाला बळी पडू नये असे आवाहन सायबर पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी ठग आघाडीच्या औषध उत्पादक आणि वितरक कंपन्यांची नावे, सिम्बॉल्सचा वापर करत आहेत.
सायबर विभागाच्या कारवाईत समोर आलेल्या माहितीत, ठगांनी सिप्ला कंपनीचे नाव, सिम्बॉलचा वापर करुन अनेकांची फसवणूक केली. काही दिवसांपूर्वी सिप्ला कंपनीला त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात आपल्या अधिकृत विक्रेत्याने पैसे घेऊनही रेमडेसिविर, टोसिलीझुमॅबचा पुरवठा केला नसल्याचे समजले. पुढे या तक्रारीच्या वाढत्या संख्येमुळे त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
यात ठगांनी स्वत:ला सिप्ला कंपनीचे अधिकृत वितरक भासवून रेमडेसिविर, टोसिलीझुमॅबचा साठा उपलब्ध असल्याचे संदेश व्हॉट्सअॅप, फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांवरून पाठवल्याचे समोर आले. ग्राहकांचा विश्वास बसावा यासाठी त्यांनी कंपनीचे सिम्बाॅल स्वत:च्या समाजमाध्यम खात्यावरील प्रोफाईल पिक्चर, डीपी ठेवले होते.
सावज जाळ्यात येताच, त्याच्याकडून पैसे उकळून ही मंडळी त्यांना अर्धे पैसे गुगलवरून पाठविण्यास सांगत असत. काही जण लवकरात लवकर औषध मिळावे म्हणून पूर्ण रक्कम पाठवत होते. पैसे मिळाल्यानंतर ही मंडळी नॉट रिचेबल होत असत. त्यामुळे अशा प्रकारे कोणी पैशांची मागणी करत असल्यास त्यावरील आमिषाला बळी पडू नये असे आवाहन सायबर पोलीस महाराष्ट्र यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच सायबर विभागाने याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासही सुरुवात केली आहे.
लसीकरण नोंदणीच्या नावाखालीही फसवणूक
कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस मिळवून देण्याच्या नावाखालीही फसवणूक होत आहे. यात, फेसबुक, व्हॉट्सॲपवर संदेशाद्वारे लिंक पाठविण्यात येत आहे. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका, शासनाच्या अधिकृत लिंकवरूनच नोंदणी करा, असे आवाहनही महाराष्ट्र सायबरचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले.
बनावट बँक खात्यात पैसे वर्ग
ठगांनी बनावट कागदपत्रांद्वारे दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये कंपनीच्या नावे बँक खाती उघडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अशीही होते फसवणूक
फेसबुकवरून विविध जाहिरातींच्या आडून ठग नागरिकांना स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून गंडा घालतात. तर दुसरीकडे बनावट प्रोफाइलवरून आधी ओळख करुन घ्यायची. पुढे ओळखीतून प्रेमात रूपांतर होताच संबंधित व्यक्तीची गोपनीय माहिती मिळवून फसवणूक करायची, अशा घटनाही वाढत आहेत. पुढे गोपनीय माहिती, अश्लील फोटो शेअर करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी होते.