पुणे : दुचाकी चोरी करणाऱ्याला एक वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.पानसरे यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त 15 दिवसाचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
अमीर तुफेल खान (वय 20, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात एजाज रहिम खान (वय 46, रा. जयजवाननगर, येरवडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 9 मार्च रोजी 2014 रोजी रात्री 12.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली.
एजाज यांनी घराजवळ दुचाकी पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात अमीर याला अटक केली. त्याच्याकडून गाडी जप्त केली. या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अमीर याला दोषी धरले. त्यावेळी तो विवाहित असून, घरातील कर्ता आहे. त्यामुळे त्याला चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सोडून देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली. तर सरकारी वकील वामन कोळी यांनी त्याला विरोध केला. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर आणखी गुन्हे प्रलंबित आहेत. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला परिविक्षा अधिनियमाचा लाभ देणे योग्य ठरणार नाही. त्याने केलेले कृत्य क्षमेस पात्र नसून, शिक्षेचा समाजात सकारात्मक प्रभाव समाजामध्ये पसरवणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.