- वासुदेव पागी
पणजी : अतिमहनीय व्यक्ती व इतरांची बोगस फेसबूक प्रोफाईल करून लोकांंची फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार हे साहेबांचा दुसरा नंबर असल्याचे सांगून असल्या हरकती करीत असतात असे तपासातून आढळून आले आहे. डुअल सीमकार्ड मोबाईलचा जमाना असल्यामुळे बहुतेक लोक एक पेक्षा अधिक सीमकार्ड असलेले फोन वापरतात. अतिमहनीय व्यक्तींच्या बोगस व्हॉटसॲप प्रोफाईल करून लोकांची फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार नेमके याचाच फायदा उठवित असल्याचे आढळून आले आहे.
अमुक अमुक अधिकाऱ्याचा किंवा प्रतिष्ठित माणसाचा हा दुसरा क्रमांक असल्याचे ते सांगत असतात. त्यामुळे साशंक झालेली माणसेही हे खरे मानून चालतात असेही आढळून आले आहे. या प्रकरणात ज्या संशयितांना सायबर विभागाकडून पकडण्यात आले आहे त्या संशयितांच्या कोठडीतील तपासादरम्यान आलेला निष्कर्षही हेच सांगत आहे की एखाद्या व्यक्तीचा हा दुसरा क्रमांक असल्याचा बनाव करून ते फसवणूक करीत आहेत अशी माहिती सायबर अधिकाऱ्याकडून देण्यात आली. कारण अधिकाऱ्यांच्या बाबतीत हा खासगी क्रमांक असल्याचेही सांगतात.
बोगस प्रोफाईल बनविण्यापूर्वी सायबर लफंगे हे नेहमी तपास यंत्रणेपेक्षा दोन पावले पुढेच असतात. तसेच ते ज्या व्यक्तीची बोगस प्रोफाईल करायची असेल त्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेतात. सोशल मिडिया माद्यमांवरूनच सायबर गुन्हेगार अशा प्रकारची माहिती घेतात असे सायबर तज्ज्ञ हेरॉल्ड डिकॉस्ता सांगतात. त्यामुळे सोशल मीडियावर आपली किती माहिती जाहीर करावी आणि पाहण्यासाठी कुणाला खुली सोडावी हे लोकांनी ठरवावे असेही ते सांगतात. विशेष करून अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील लोक आणि राजकी नेते अशा लोकांचीच प्रोफाईल ते बनवितात.
बळीचा बकरा निवडताना
ज्या माणसाला फसवायचे आहे त्या माणसाची निवडही ते अत्यंत हुशारीने करतात. त्याची माहितीही सोशल मीडियावरून काढून घेतात. फेक प्रोफाईल बनविण्यात आलेल्या माणसाने काहीही सांगितले तर डोळे बंद ठेऊन विश्वास ठेवणाऱ्या माणसाशीच ते संपर्क करतात आणि त्यालाच बळीचा बकरा बनवितात.