सध्या WhatsApp चा वापर करत नसेल अशा व्यक्ती फारच कमी असतील. परंतु आता या अॅपचा वापर करून युझर्सची फसवणूक होत असल्याच्या घटना सध्या घडताना दिसत आहे. नुकताच WhatsApp वर एक सर्व्हे मेसेज व्हायरल होत आहे. Amazon च्या माध्यमातून तुम्हाला गिफ्ट मिळेल असा सर्व्हे WhatsApp च्या माध्यमातून फिरत आहे. परंतु तुमच्याकडे हा मेसेज आला असेत तर तुम्ही नक्कीच मोठ्या स्कॅममध्ये फसू शकता. कारण हा बनावट मेसेज असून यात कोणतंही तथ्य नाही.
या मेसेजमध्ये एक URL देण्यात आली असून यावर क्लिक केल्यास तुम्हाला मोफत गिफ्ट जिंकण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक सर्व्हेंचं पेज ओपन होतं. यावर काही वैयक्तीक माहितीही मागितली जाते. यामध्ये युझरचं वय, जेंडर, अॅमेझॉनला तुम्ही किती रेटिंग द्याल असे अनेक प्रश्न विचारले जातात. याशिवाय यामध्ये तुम्ही अँड्रॉईड फोन किंवा आयफोन यापैकी कोणत्या स्मार्टफोनचा वापर करता असंही विचारलं जातं. या पेजवर एक टायमर आहे जो त्या व्यक्तीला अर्जन्सी फील करवून देतो आणि संबंधित युझर त्यात फसतो. यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर युझरला त्यांच्या स्क्रिनवर काही गिफ्ट बॉक्स दिसतात. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हुवावे मेट ४० हा स्मार्टफोन जिंकल्याचं सांगितलं जातं. परंतु हे गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला ते क्विझ पाच ग्रुप किंवा २० व्यक्तींसोबत शेअर करण्यास सांगितलं जातं.
असं वाचा या फ्रॉडपासून अशा कोणत्याही सर्व्हेमध्ये अनेकदा युझरला कोणतंही गिफ्ट मिळत नाही, परंतु युझर यात अडकला जातो. या क्विझचं जे युआरएल दिसतं ते बनावट आहे. अनेकदा अशा लिंक्स आल्यानंतरही युझर्स याबाबत सतर्क असल्याचं दिसून येत नाही. परंतु अशा सर्व्हेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं गिफ्ट देण्यात येत नाही. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी युझर्सनं सतर्क राहणं आणि खऱ्या URL ओळखणं अनिवार्य आहे. जेव्हा तुम्ही या युआरएलकडे पाहाल तर यामध्ये कताही जंक आणि अनवॉन्टेंड कॅरेक्टर्सही दिसून येतील.