मुंबई: अनोळखी तरुणीने एटीएम सेंटरमध्ये दिलेला मोबाईल क्रमांक हा तिथल्या गार्डचा नसून सायबर भामट्याचा असल्याचे ट्रॅव्हल एजंटस फेडरेशन ऑफ इंडिया कंपनीतून निवृत्त झालेल्या ग्लडविन पिंटो (७१) यांना समजल्यावर धक्काच बसला. कारण त्यावर फोन नंतर त्यांच्या बँक खात्यातून हजारो रुपये काढण्यात आले.
पिंटो हे मालाडच्या एवरशाईन नगरमध्ये पत्नी ब्रुनीतासोबत राहतात. ते ७ फेब्रुवारी रोजी ऑर्लेम चर्च येथील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममध्ये कोणी नव्हते. मात्र तरीही एक अनोळखी इसम थांबला होता जो थोड्या वेळाने आत जाऊन बाहेर आला. तेव्हा पिंटोंनी एटीएम मधून डेबिट कार्ड ने १० हजार रुपये काढले व त्यांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले. तेव्हा ते एटीएम सेंटरच्या गार्डला शोधू लागल्याने समोर उभी मुलगी त्यांच्या मदतीच्या बहाण्याने पुढे आली. तिला कार्ड अडकल्याचे सांगत त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न करताना एटीएम सेंटरमध्ये शिरत ती पिंटोंच्या मागे उभी राहिली.
तिने त्यांना इंग्रजीत कागदावर GAURD 7295929742 असे लिहिलेला कागद देत त्यावर फोन करायला सांगितले. फोन उचलणाऱ्याने तो बीकेसीमध्ये मिटींगसाठी आल्याचे बोलत मशीनच्या की पॅड वरील काही बटन दाबण्यास त्यांना सांगितले. तसे केल्यावरही कार्ड बाहेर न आल्याने त्यांना कार्डचा पिन नंबर दाबण्यास सांगितले जे सदर मुलगी पाहत होती. पिंटोनी नंबर दाबल्यावरही कार्ड न निघाल्याने दुपारी ३ वाजता इंजिनियर येऊन ते काढून देईल असे त्यांना फोन वरील व्यक्तीने सांगितले.
पिंटो घरी गेले आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातून ५६ हजार काढण्यात आल्याचा मेसेज आला. ज्यातील १० हजार पिंटोनी व उर्वरित रक्कम फसवणूक करत काढण्यात आली. त्यामुळे पिंटू पुन्हा त्या एटीएममध्ये गेले आणि सकाळचा इसम त्यांना पुन्हा दिसला. ज्याने पिंतोना पाहत तिथून पळ काढला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पिंटोंची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी १० फेब्रुवारी रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार आम्ही एटीएम समोर असलेला, गार्ड म्हणून फोनवर बोलणारा असे दोन इसम तसेच तो नंबर पिंटोना देणाऱ्या महिलेचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.