मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने पुण्यातील भंगारवाला हरिशकुमार बालकराम निसाद (२६) याला उत्तर प्रदेश मधून अटक केली आहे. हरिशने लोणकर बंधुंकडून पैसे घेऊन शूटर्सना पुरविले, तसेच कुर्ला येथे भाड्याने घर घेण्यासाठी मदत केल्याचेही गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे.
मूळचा उत्तर प्रदेशातील बेहराईजचा शेतकरी कुटुंबातील असलेला हरीश बारावी पास आहे. तो गेल्या ८ ते १० वर्षांपूर्वी कामानिमित्त पुण्यात आला. तेथे छोटे-मोठे काम करत दोन ते तीन वर्षापूर्वी त्याने स्वतःचा भंगारचा व्यवसाय सुरू केला. लोणकर बंधूची डेअरीपासून एक दुकान सोडून हरीशचे भंगारचे दुकान होते. त्यामुळे लोणकर बंधुंसोबत त्यांची ओळख होती. गुन्हे शाखेने केलेल्या तपासात अटक आरोपी गुरुमेल सिंग आणि धर्मराज राधे कश्यप यांना हरीशनेच पैसे पुरविल्याचे समोर आले.
हरीशच्या गावाचा पसार आरोपी शिवकुमार गौतम चार ते पाच वर्षांपूर्वी पुण्यात कामासाठी आला. त्या पाठोपाठ चार ते पाच महिन्यांपूर्वी धर्मराज कश्यप तेथे कामासाठी रुजू झाला होता. हत्येचे प्लॅनिंग ठरल्यानंतर तीन ते चार महिन्यांपासून हत्येची रूपरेषा ठरविण्यास सुरुवात झाली.
लोणकर बंधुंचा डेअरीतच हत्येसंबंधित प्लॅनिंग सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले आहे. कुर्ला येथे भाड्याने घर घेण्यासाठी हरीशने मदत केली. तो मुंबईतही येऊन गेला. हरीशलाही काम झाल्यानंतर जास्त पैसे देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
कुर्ल्यातील घर शिवकुमारच्या नावावरकुर्ल्यातील भाड्याचे घर घेताना शिवकुमार गौतमने त्याचे खरे कागदपत्रे दिले होते. घर मालकाची गुन्हे शाखेच्या कक्ष ९ अंतर्गत चौकशी सुरू आहे.
सेकंड हॅण्ड बाईकची पुण्यात खरेदी, मुंबईत रेकी- हरिशकुमारने पुण्यात ६० हजार रुपयात बाईक खरेदी केली. याच बाईकने पुण्यातून मुंबईत आला. रेकीसाठी ही बाईक शिवकुमारकडे दिली. पुढे शुटर्सकडून याच बाईकवरून मुंबईत रेकी करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. हरीशकुमारने स्वतः च्या कागदपत्रांवर ही बाइक खरेदी केली. गुन्हे शाखेने ही बाईक जप्त केली आहे. तसेच, कुर्ल्यातील घरातून गांजासह काही कागदपत्रे गुन्हे शाखेच्या हाती लागल्याचेही समजते आहे.- बाईकसाठी प्रवीणने पैसे दिल्याचे सांगितले. प्रवीणच्या म्हणण्यानुसार शुभमकडून घेवून हे पैसे हरीशकुमारला दिल्याचे चौकशीत समोर येत आहे.