मीरा राेड : मॉडेल व सहअभिनेत्री असलेल्या दोघींकडून कमिशन घेऊन त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा प्रकार मीरा-भाईंदर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी चार मॉडेलची सुटका करून दोन जणींना ‘पिटा’ कायद्याखाली अटक केली आहे.मॉडेलिंग व सहकलाकार म्हणून काम करणाऱ्या तरुणींना वेश्याव्यवसायासाठी पुरवले जात असल्याची माहिती मीरा-भाईंदर झोन एकचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली. त्यांनी नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करून कारवाईचे निर्देश दिले.पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून चार मॉडेल असलेल्या तरुणींची मागणी केली आणि दोन लाख रुपयांना सौदा ठरवला. ठरल्यानुसार सोमवारी सायंकाळी दोन मोटारींमधून अर्पिता घोशाल (३०, रा. इराणी चाळ, ठाकुर्ली, कल्याण) व पिंकी दुबे (३०, रा. माधव बिल्डिंग, न्यू लिंक रोड, गोरेगाव) या दोघी चार मॉडेलना घेऊन उत्तनच्या धवगी मार्गावर आल्या. ग्राहकाकडून रक्कम स्वीकारताच पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले.पीडित चार तरुणींची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सदर मॉडेल २३ ते ३५ वयोगटातील आहेत.
भाईंदर पोलिसांनी उद्ध्वस्त केले सेक्स रॅकेट, चार मॉडेलची सुटका करून दोन मॉडेलना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 2:10 AM