मुंबई - संभाजी भिडे यांची येत्या रविवारी लालबागमधील गणेश गल्लीतील गणेश मैदान येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई या संस्थेमार्फत व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. मात्र, या व्याख्यानाला भीम आर्मीने विरोध करत मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) यांना पत्र देऊन कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संभाजी भिडे हे नेहमीच जातीवाचक भाष्य करून २ समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असते व तरुणांना चुकीचा जातीवर आधारित इतिहास सांगून त्यांना भडकविण्याचे काम करत असतात. तसेच ते आपल्या वादग्रस्त भाषणांनकरिताही प्रसिद्ध आहेत. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या भीमा-कोरेगाव दंगलीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे यंदाचा भीमा-कोरेगाव मानवंदना दिवस देखील जवळ येऊन ठेपला असताना भिडे यांची मुंबईसारख्या सुरक्षित आणि शांतता प्रिय शहरात सभा होणे हे शहराच्या एकात्मतेकरता फारच धोक्याचे आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. देशातील ही एकंदर वातावरण पाहता असुरक्षिततेची भावना सामान्य माणसाच्या मनात घर करून बसली आहे. अशा वातावरणात सदर व्यक्तीस येण्याची परवानगी देणे म्हणजे विस्तवाला हवा देण्यासारखे होईल. भिडे यांच्या येण्यामुळे आपल्या शहरात काही समाज कंटकांकडून कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते अशी माहिती या पत्रातून देण्यात आली आहे.
लालबाग येथे होऊ घातलेल्या कार्यक्रमात काही वादग्रस्त विधान होऊन त्याचे परिणाम शहरातील सामान्य जनतेस भोगायला लागू नयेत या करिता दक्षता घेणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या सर्व गोष्टी टाळण्याकरिता आणि आपल्या शहराची शांतता व एकता सदैव अबाधित राहाण्याकरिता सावधगिरीचा उपाय म्हणून संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमास परवानगी नाकारावी अशी विनंती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे.