मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश द्या असा मागणी करणारा राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांचा हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. बुधवारपर्यंत नवलखा आणि तेलतुंबडेंना उत्तर सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपींना अटकेपासून दिलेला दिलासा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवला. गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी हायकोर्टाकडून ६ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली होती. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना २ डिसेंबरपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण हायकोर्टाने मागील सुनावणीदरम्यान दिले होते. तर याच प्रकरणातील सहआरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाबरोबर गौतम नवलखा यांच्याही जामीन अर्जावरील सुनावणी २ डिसेंबर रोजी न्या. पी. डी. नाईक यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने ठेवली होती. पुण्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी, २०१८ रोजी झालेल्या जातीय हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा यांच्यासह आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्विस, वरवरा राव, अरुण फरेरा व अन्य काही सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविला आहे. या सर्वांवर भारतीय दंडसंहितेसह बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) (यूएपीए) कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भीमा कोरेगाव प्रकरण : नवलखा, तेलतुंबडेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश द्या, सरकारी वकिलांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 7:33 PM
राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांचा हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देबुधवारपर्यंत नवलखा आणि तेलतुंबडेंना उत्तर सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. भारतीय दंडसंहितेसह बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) (यूएपीए) कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.