- नितिन पंडीत
भिवंडी: उत्तर प्रदेश येथील गावात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघा जणांनी आपसात संगनमत करुन मुंबई गोरेगाव येथे राहणाऱ्या सज्जन अली शब्बीर अली फकीर ( वय २० वृक्ष ) यास एका महिलेसोबत मैत्रीत अडकविले. त्यानंतर मोबाईलवरून अश्लिल संभाषणाच्या जाळ्यात ओढत फसवून भिवंडी येथे बोलावून त्यास मित्रासह डांबून ठेवत पैशांची मागणी केल्या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी तक्रार दाखल होताच तातडीने पावले उचलत तिघा जणांना रविवारी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे .
सज्जन अली याचे उत्तरप्रदेश येथील गावी एका व्यक्ती सोबत भांडण झाले असता त्याचा राग मनात असल्याने त्यास धडा शिकविण्यासाठी आरोपी लाल मोहम्मद फकीर,शकील मोहम्मद फकीर, व नेहालाल मोहम्मद फकीर ( सर्व रा.धामणकर नाका भिवंडी ) यांनी त्याच्या अपहरणाचा कट रचला होता . सज्जांचे अपहरण करून अद्दल शिकवून नातेवाईकांकडून पैसे उकलण्याचा डाव या तिघांनी आखला होता . त्यासाठी एक नवा सिमकार्ड घेऊन त्याद्वारे इंदु नावाची आभासी व्यक्ती बनुन १३ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान फिर्यादी याच्याशी मोबाईल द्वारे संभाषण करून अश्लील मॅसेज पाठविले व ५ फेब्रुवारी रोजी भेटीचे आमिष दाखवून फोन करुन भिवंडी शहरातील नारपोली येथे बोलावुन घेतले . सज्जन हा रविवारी सकाळी आठ वाजता त्याच्या मित्रांसोबत भिवंडीत पोहचला असता त्याचे अपहरण करून रात्री साडे अकरा वाजता पर्यंत लाल मोहम्मद याने त्याचा भाऊ कलाम यांचे शांतीनगर, बाबाहॉटेल जवळ भिवंडी येथे सज्जन अली व त्यांचा मित्र मोहम्मद शमीम यास डांबुन ठेवले. त्यांच्या कडून २० हजार रुपये दे नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ करीत मारहाण करीत सज्जन अली शब्बीर अली फकीर याची आई, भाऊ, अरमान, असलम यांना तसेच त्याचे मालक बाबु शेठ यांना गुगल पे वरून पैशाची मागणी केली.
दरम्यान या बाबतची तक्रार शांतीनगर पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे शांतीनगर बाबा हॉटेल परिसरातील एक खोलीतून दोघांची सुटका करीत तिघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निलेश बडाख हे करीत आहेत. तिघा आरोपींना सोमवारी न्यायालयात हजार केले असता तिघांनाही १० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे.