मुंबई - आज परळ येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत नाहक चार जणांचे बळी गेले. याप्रकरणी विकासक अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवालाच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि कलम 304, 336, 337, 338 सह महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी ऍक्ट 2006 च्या3 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमारतीच्या विकासकाने इमारतीतील कायमस्वरूपी आग विझविण्याची यंत्रणा चालू ठेवणे व इलेक्ट्रिक डकट सील करणे अत्यावश्यक आहे याची जाणीव असताना देखील सदर यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवून व इमारतीचे इलेक्ट्रिक डक्ट सील न केल्याने सदर इमारतीस लागलेल्या आगीत 01 महिला व 03 पुरुष असे एकूण 04 इसम मयत झाले व 12 पुरुष व 06 स्त्रिया जखमी झाले. तसेच आग विझवताना अग्निशमन दलाचे 05 कर्मचारी जखमी झाले आणि इमारतीतील रहिवाश्यांच्या जीवितास व व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण केला, म्हणून फिर्यादी विनोद दत्ताराम मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त अंबिका यांनी दिली.