मुंबई : हुक्का पार्लरमध्ये पार्टी सुरु असताना अचानक एनसीबीचा छापा मारल्याचे सांगत एका भोजपुरी अभिनेत्रीला ताब्यात घेतले. पुढे, कारवाईच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी २० लाखांच्या खंडणीसाठी दबाव वाढला. याच दबावात अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना जोगेश्वरीत घडली. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी एनसीबी अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या दुकलीला अटक करण्यात आली आहे. मित्रानेच हा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून त्याचा शोध सुरु आहे.
सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. परदेशी हा बांधकाम कंत्राटदार आहे तर, वळिंबे हा खासगी नोकरी करत असून आसनगाव येथील रहिवासी आहे. अभिनेत्री जोगेश्वरी येथील हिल पार्कमध्ये भाड्याने राहण्यास होती. पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर रोजी अभिनेत्री आपल्या मित्र मैत्रिणीसह मुंबईतल्या एका पंच तारांकित हॉटेल मध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी करत होती. त्यादरम्यान या दुकलीने एनसीबीचा छापा पडल्याचा बनाव करत, अभिनेत्रीला ताब्यात घेतले. कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केली. पुढे संबंधित रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी दबाव वाढला. याच दबावाला कंटाळून अभिनेत्रीने २३ तारखेला जोगेश्वरी येथील हिल पार्क परिसरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच, अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अभिनेत्रीला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. मैत्रीणीच्या चौकशीत एनसीबी अधिकाऱ्याची माहिती समोर येताच अंबोली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक, गुन्हेगारी कट, खंडणी सारख्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे.