एस. पी. सिन्हालाेकमत न्यूज नेटवर्कपाटणा : राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांचे ‘हनुमान’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार भोला यादव यांना सीबीआयने अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आयकर खात्याने भोला यादव यांच्या दरभंगा जिल्ह्यातील घरी तसेच पाटण्यात छापेमारी केली. २००४ ते २००९ या कालावधीत लालू यादव केंद्रात रेल्वेमंत्री असताना भोला यादव त्यांचे ओएसडी होते. त्यावेळी रेल्वेमध्ये जमिनीच्या बदल्यात अनेकांना नोकरी लावल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याचा मास्टरमाइंड भोला यादव यांना मानले जाते.
लालूंची अनेक रहस्ये भोला यादव यांच्याकडे दडलेली आहेत, अशी चर्चा आहे. ते लालूंसमवेत सावलीप्रमाणे राहत. लालूंचाही त्यांच्यावरच सर्वांत जास्त विश्वास होता. जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात सीबीआयने ४ दिवसांपूर्वी भोला यादव यांना आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते.
लालूंच्या मुलीला बहीण मानून जमीन देणारा ताब्यातभोला यांच्याबरोबरच हृदयानंद चौधरी यांनाही अटक केली. चौधरी यांनी लालूंची मुलगी हेमा यांना बहीण मानून जमीन भेट दिली होती. जमीन घेऊन नोकरी दिल्याच्या प्रकरणात ही अटक आहे. हृदयानंद यांचे ज्येष्ठ बंधू देवेंद्र चौधरी यांनी मे २०२२ मध्ये जमीन दिल्याची कबुली दिली होती. सीबीआयने गुन्ह्यात म्हटले आहे की, ब्रजनंदन चौधरी यांनी महुआ बागेतील ३३७५ वर्गफूट जमीन २० मार्च २००८ रोजी हृदयानंद चौधरी यांना ४.२१ लाखांना विकली. तीच जमीन हृदयानंद यांनी हेमा यादव यांना भेट दिली. त्यावेळी जमिनीची किंमत ६२.१० लाख होती. याच्या बदल्यात हृदयानंद यांना आधीच नोकरी मिळाली होती.