मीरारोड - पैश्यांचा पाऊस पाडून ४० कोटी रुपये मिळवून देतो सांगत विधीसाठी साडेबारा लाख उकळून भाईंदरच्या एका ६४ वर्षीय वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी भोंदू बाबा विरुद्ध अनिष्ठ अघोरी कृत्यांना प्रतिबंध व काळी जादू अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर पश्चिमेच्या राई गावातील सदानंद नगर येथे राहणारे ६४ वर्षीय प्रदीप महादेव पाटील यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार २ डिसेम्बर रोजी पोलिसांनी विनोद आचार्य ह्या भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप यांची पत्नी संगीता ह्या नेहमी आजारी असल्याने त्यांचे नालासोपारा येथील परिचित दिनेश पांडे व अशोक यांनी त्यांना नालासोपारा येथीलच विनय आचार्य नावाच्या बाबाकडे नेले होते. नालासोपारा पश्चिमेस शिवम इमारतीत राहणाऱ्या आचार्यकडे प्रदीप हे पत्नीला दाखवण्यास २०१९ साली गेले असता तेथे विविध देवी देवतांच्या प्रतिमा ठेऊन पूजा चालली होती. आचार्य ह्याने, तुमच्या पत्नीला बरे करेन व तुमच्या घरी पैश्यांचा पाऊस पाडून ४० कोटी रुपये मिळवून देईन, असे सांगितले.
बाबा आचार्य तसेच दिनेश व अशोक वर विश्वास ठेऊन प्रदीप यांनी बाबाने सांगितल्या नुसार घरी विधी ठेवला. प्रदीप कडील ३ लाख रुपये एका खोक्यात ठेऊन तो लाल कपड्यात गुंडाळून बाबाने घरातील कोपऱ्यात ठेवला. सर्वाना विधी करायचा म्हणून बाहेर काढले. विधी झाल्याचे सांगून २१ दिवस त्या कपड्याच्या गाठोड्याला हात लावायचा नाही व मी आल्यावर ४० कोटी रुपयांचा पाऊस पाडून देईन सांगून बाबा आचार्य हा निघून गेला.
काही दिवसांनी गावी गेलेल्या बाबाने कॉल करून पूजेसाठी आणखी दिड लाख हवेत सांगितल्याने प्रदीप यांनी पत्नीचे सोन्याचे गंठण गहाण ठेऊन दिड लाख मनीऑर्डरने पाठवले. नंतर अनेक महिने बाबाचा मोबाईल बंद व तो नालासोपारा येथील घरी सुद्धा नव्हता. प्रदीप यांनी बाबाचा शोध सुरु ठेवत अखेर आचार्य नालासोपाऱ्यातच सापडला. आचार्य हा प्रदीप यांच्या घरी २०२१ मध्ये आला असता लाल कपड्यातील खोक्याची जागा चुकीची असल्याचे सांगून पुन्हा पूजा करावी लागेल तसेच औषधांसाठी २ लाख मागितले. अशा प्रकारे वेळोवेळी आचार्यने प्रदीप यांच्या कडून पैसे मागत एकूण साडे नऊ लाख रुपये उकळले.
बाबा पैश्यांचा पाऊस पाडत नसल्याने प्रदीप यांना संशय आल्याने घरातील लाल कपड्यातील खोका उघडला असता त्यात सुरवातीला ठेवलेले ३ लाख रुपये नसल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर भोंदूबाबा विनय आचार्य कडे त्याने घेतलेले १२ लाख २५ हजार सातत्याने परत मागूनसुद्धा आचार्य हा टोलवाटोलवी करू लागला. या प्रकरणी आचार्यवर गुन्हा दाखल करून भाईंदर पोलीस पुढील तपास करत आहेत.