मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका मुलीने वृद्ध आई-वडील आणि भावासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. मुलीने तिच्या वृद्ध आई-वडिलांना आणि भावाला संपत्तीसाठी एका खोलीस कोंडून ठेवलं होतं. मुलगी तिघांशी भांडायची आणि त्यांना जेवणही देत नव्हती. वृद्धाच्या ओळखीच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांचीही सुटका केली. पोलीस आल्यावर वृद्ध जोडपं एका खोलीत आढळलं, ज्या खोलीला बाहेरून कुलूप होतं.
हबीबगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेचे सेवानिवृत्त चीफ इंजिनिअर सीएस सक्सेना हे त्यांची पत्नी कनक सक्सेना आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेला मुलगा यांच्यासह राहत आहेत. त्यांना निधी नावाची एक मुलगी देखील आहे. निधीचं लग्न 2002 मध्ये झालं. 2016 मध्ये निधीचा पतीसोबत वाद झाला आणि ती भोपाळला परतली. तिने पतीपासून घटस्फोट घेतला. निधीला दोन मुलं आहेत. गेल्या 7 वर्षांपासून निधी तिच्या माहेरच्या घरी राहत आहे.
सीएस सक्सेनाचे ओळखीचे लोक त्यांच्याशी फोनवर बोलायचे आणि अनेकदा त्यांना भेटायला यायचे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मुलीने त्यांना वडिलांना भेटू दिलं नाही. तसेच फोनवरही बोलणे होऊ शकले नाही. 19 जून रोजी ओळखीचा माणूस पुन्हा पत्नीसह सक्सेना यांच्या घरी पोहोचला. याच दरम्यान मुलीने गैरवर्तन केले आणि अपमान करून त्यांना परत पाठवले. यानंतर त्या व्यक्तीने हबीबगंज पोलिसांकडे लेखी तक्रार केली आणि सक्सेनासोबत काही अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली.
प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी विशेष पथक तयार करून सक्सेना यांचं घर गाठलं. सक्सेना यांच्या मुलीने पोलिसांना घरात घुसण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला. खोलीचं कुलूप उघडल्यानंतर पोलिसांना एक वृद्ध जोडपं आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती दिसली. पोलिसांनी तिघांनाही तेथून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. वृद्ध दाम्पत्याचे जबाब घेत मुलीवर गुन्हा दाखल केला.
वृद्ध जोडप्याने सांगितले की, त्यांची मुलगी भांडायची. जेवणही दिले जात नव्हतं. खोलीत कोंडून ठेवलं होतं. मुलीने बँक खात्यासह सर्व कागदपत्रे आपल्याकडे ठेवली आहेत. त्यांना अनेक कागदपत्रांवर सह्या करायला लावल्या आणि पेन्शनचे पैसेही काढले. घर विकून तीन कोटी रुपये देण्यासाठी मुलगी दबाव टाकत आहे. वृद्ध महिलेने अंगावरील मारहाणीच्या जखमा दाखवत आपली व्यथा मांडली. मुलीने आईवडिलांना बेदम मारहण केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.