भोपाळ-
भोपाळमधील एका बड्या खासगी शाळेतील चिमुकल्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीनं जेव्हा तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती पालकांना दिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चिमुकल्या मुलीला गुड आणि बॅड टचचा फरकही कळत नाही. पण जेव्हा पालकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी शाळेत जाऊन याबाबतची माहिती दिली. शाळेच्या व्यवस्थापनाकडून अंतर्गत चौकशी करुन आरोपी बस ड्रायव्हरला क्लीनचीट दिली होती. पालकांनी आता थेट पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं आहे.
आई-वडीलांच्या तक्रारीनंतर शाळेच्या बस ड्रायव्हरला आणि महिला मदतनीसला अटक केली आहे. ३२ वर्षीय आरोपी ड्रायव्हर दोन मुलींचा बाप आहे आणि तीनच महिन्यांपूर्वी तो शाळेच्या बसवर ड्रायव्हर म्हणून काम पाहात होता. पीडित मुलीनं एका ग्रूप फोटोच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली आहे. पोलीस सध्या याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. शाळेच्या बस ड्रायव्हरची नियुक्ती करण्यापूर्वी त्याची पडताळणी केली गेली होती का असं शाळेच्या व्यवस्थापनाला विचारण्यात आलं असता व्यवस्थापनाकडून यासंबंधिची सर्व प्रक्रिया करण्यात आली होती असं सांगण्यात आलं आहे. तसंच पालकांनी त्यांच्या मुलीसोबत घडलेल्या या प्रकाराची तक्रार नोंदवण्यास इतका वेळ का लावला? असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण तत्काळ वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं असतं. पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर सोमवारी मुलीची वैद्यकीय तापसणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या तपासात मुलीवर अत्याचार झाल्याचे संकेत मिळाले असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
मुलीचे कपडे बदलले गेले होतेगेल्या आठवड्यात गुरुवारी जेव्हा पीडित मुलगी घरी पोहोचली तेव्हा तिचे कपडे बदलले गेले होते हे पाहून तिच्या आईला आश्चर्य वाटलं. तिच्या बॅगमध्ये तिला दिले जाणारे अतिरिक्त कपड्याचा जोड तिनं परिधान केला होता. तुझे कपडे कुणी बदलले असं जेव्हा आईनं चिमुकलीला विचारलं तेव्हा चिमुकली उत्तर देऊ शकली नाही. यानंतर आई-वडिलांची चिंता वाढली. त्यांनी याबाबत तत्काळ वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापकांना याबाबत फोन केला. मुलीचे कपडे शाळेत बदलले गेल्याची शक्यता दोघांनीही नाकारली. जेव्हा चिमुकल्या मुलीनं शाररीक वेदना होत असल्याची तक्रार केली आणि पालकांची चिंता वाढली.
यानंतर पालकांनी तिला बसवून समुपदेशन केलं, त्यानंतर मुलीने सांगितलं की बस चालकानं तिच्यासोबत वाइट कृत्य केलं आणि त्यानच कपडे बदलले. याची माहिती पीडित मुलीनं पोलिसांना दिली आहे. दुसऱ्या दिवशी पालक शाळेत पोहोचले आणि मुलीनं शाळेच्या चालकाला ओळखलं. सोमवारी कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा बंद असल्यानं आठवड्याच्या शेवटी त्यांनी गुन्ह्याची नोंद केली नाही. प्रत्येक ट्रीपमध्ये बसमध्ये नऊ ते बारा विद्यार्थी प्रवास करत असल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. पीडित मुलगी बसच्या शेवटच्या स्टॉपवर उतरायची.
शेवटच्या स्टॉपवर उतरलेला मुलगा कुठे गेला?त्याचवेळी, शेवटच्या स्टॉपवर खाली उतरणारा आणखी एक मुलगा त्यादिवशी बसमध्ये होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. यासोबतच पीडित मुलीवर त्याच्या उपस्थितीत अत्याचार झाला का, याचाही तपास करण्यात येत आहे. जर तो त्या दिवशी शाळेत गेला नसेल, तर ती मुलगी बसमध्ये ड्रायव्हर आणि महिला मदतनीससोबत एकटीच होती. एसीपी निधी सक्सेना यांनी सांगितले की, त्या दिवशी महिला मदतनीस बसमध्ये उपस्थित होती कारण पीडित मुलगी जेव्हा बसमधून खाली उतरली तेव्हा मुलीच्या पालकांनी तिला पाहिलं होतं. अशा स्थितीत महिला मदतनीसाचीही भूमिका संशयास्पद वाटते. त्यामुळे पोलिसांना संबंधित महिलेवरही संशय आहे.
ही शाळा रतीबाद परिसरात आहे. प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असल्याचं पोलीस आयुक्त मकरंद देऊस्कर यांनी सांगितलं आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. चालक आणि मदतनीस एकमेकांवर शाळेचा ड्रेस बदलल्याचा आरोप करत होते. त्यांच्यावर IPC चे कलम-376 AB लागू करण्यात आले आहे, त्यात 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार केला असल्यानं मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. यासोबतच पॉक्सो कायद्याच्या कलम ५/६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.