भोपाळ: कर्जात बुडालेल्या मॅकेनिकनं त्याच्या दोन मुली, पत्नी आणि आईसह स्वत:देखील विष प्राशन केलं. सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नात मॅकेनिकच्या एका मुलीचा आणि आईचा मृत्यू झाला. तर मॅकेनिक, त्याची पत्नी आणि एका मुलीचा मृत्यूसोबत संघर्ष सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबानं आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या घरातील कुत्र्याला आणि उंदरालादेखील विष पाजलं.
कुटुंबानं शीतपेयात मिसळून विष प्राशन केल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंबानं आत्महत्या करण्यापूर्वी भिंतीवर आणि कागदावर सुसाईड नोट लिहिली. डोक्यावर फार कर्ज झालं असून हतबल झाल्यानं आत्महत्या ककत असल्याचं कुटुंबानं म्हटलं. त्यांनी आत्महत्येआधी एक व्हिडीओदेखील तयार केला. त्या अनुषंगानं आता पोलीस तपास करत आहेत.
आनंद विहार वसाहतीमध्ये जोशी कुटुंब वास्तव्यास आहे. त्या कुटुंबातील ५ सदस्यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सीएसपी राकेश श्रीवास्तव यांनी सांगितलं. माहिती मिळताच पाचही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्वी जोशी आणि नंदिनी जोशी अशी त्यांची नावं आहेत. घटनास्थळी सुसाईट नोट मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य होती. मात्र त्यांच्यावर कर्ज होतं. कुटुंबानं घर गहाण ठेवलं होतं. ते सोडवण्यासाठी दर महिन्याला हफ्ता भरावा लागत होता. तो भरणं अवघड जात होतं. त्यामुळेच आत्महत्या करत असल्याची माहिती सुसाईट नोटमध्ये आहे.