जळगाव : जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटाच लावला आहे. भुसावळातील २४ गुन्हे दाखल असलेल्या ५ जणांच्या टोळीला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
बंटी परशूराम पथरोड (३३), विष्णू परशुराम पथरोड (२९), शिव परशुराम पथरोड (२६), रवींद्र उर्फ माया माधव तायडे (२४), हर्षल सुनील पाटील (२४, सर्व रा. भुसावळ) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नाव आहेत. या गुन्हेगारांनी भुसावळ शहरासह भुसावळ लोहमार्ग परिसरामध्ये दहशत पसरविली होती. त्यांच्यावर २४ गुन्हे दाखल असून त्यांच्याविरूध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्यानंतर सुध्दा त्यांच्यामध्ये काहीही सुधारणा झालेली दिसून आली नाही. अखेर पाचही जणांविरूध्दचा हद्दपार प्रस्ताव भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. चौकशीअंती पाचही गुन्हेगारांना गुन्हे करण्याच्या सवयी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जळगाव जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.