कोट्यवधींचं घबाड! ज्युनिअर ऑडिटर निघाला धनकुबेर; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:08 AM2024-10-17T10:08:44+5:302024-10-17T10:09:09+5:30
ज्युनिअर ऑडिटर रमेश हिंगोरानी यांच्या घरावर लोकायुक्त पथकाने छापा टाकून कोट्यवधींची मालमत्ता, कॅश आणि आलिशान वाहनं जप्त केली आहेत.
मध्य प्रदेशातील तंत्रशिक्षण विभागाचे ज्युनिअर ऑडिटर रमेश हिंगोरानी यांच्या घरावर लोकायुक्त पथकाने छापा टाकून कोट्यवधींची मालमत्ता, कॅश आणि आलिशान वाहनं जप्त केली आहेत. रोख रक्कम एवढी होती की, ती मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या. हिंगोरानी यांच्यावर सरकारी जमीन हडप केल्याचा गंभीर आरोपही आहे. लोकायुक्त पथकाने रमेश हिंगोरानी यांचा भोपाळमधील बैरागढ येथील बंगला, त्यांचं घर, गांधीनगरमधील उच्च माध्यमिक विद्यालय, किरण प्रेरणा शाळा आणि मॅरेज गार्डन या सहा ठिकाणी छापे टाकले.
आतापर्यंतच्या तपासात तब्बल ७० लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, १२ लाख रुपयांहून अधिक रोख आणि ४ आलिशान वाहनं जप्त करण्यात आली आहेत. पैसे मोजण्यासाठी मशीनची गरज होती. छाप्यादरम्यान, लोकायुक्त पथकाने हिंगोरानी यांच्याकडून क्रेटा आणि स्कॉर्पिओसारख्या चार आलिशान कार, १०१४ ग्रॅम सोनं आणि १०२१ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. याशिवाय १२,१७,९५० रुपयांची रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रंही जप्त करण्यात आली असून, त्यांची तपासणी सुरू आहे.
गांधीनगर येथील हिंगोरानी यांच्या शाळेत छापा टाकला असता देशी बनावटीचे पिस्तूलही जप्त करण्यात आले, त्यानंतर गांधीनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांचा मुलगा निलेश हिंगोरानी याच्यावर बेकायदेशीर हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश हिंगोरानी आणि त्यांची मुलं योगेश आणि निलेश यांच्यावरही कोट्यवधींच्या सरकारी जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप आहे.
हिंगोरानी कुटुंब 'लक्ष्मी देवी विकयोमल सराफा एज्युकेशन सोसायटी' अंतर्गत तीन शाळा चालवत होतं, त्यात त्यांच्या मुलांना कोणत्याही पात्रतेशिवाय भरघोस पगारावर नियुक्त करण्यात आलं आहे. त्याच्याविरुद्ध सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणीही चौकशी सुरू आहे. हिंगोरानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर नोंदवलेली मालमत्ता आणि खर्च हे उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा खूप जास्त असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.