बिहारमधून महाराष्ट्रात आणण्यात आलेली सुमारे ५९ मुलांची रेल्वेपोलिसांनी सुटका केली आहे. जळगाव आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली आहे. दानापूर - पुणे एक्स्प्रेसमध्ये ही मुले आढळून आली. पोलिसांना या मुलांच्या तस्करीचा संशय आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांची तस्करी होत असल्याची टीप पोलिसांना एका एनजीओने दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ट्रेनची बीएसएल स्थानकावर तपासणी केली असता जळगामध्ये ८ ते १५ वयोगटातील २९ मुले सापडली. तसेच मनमाड रेल्वे स्थानकावर ३० मुले साप़डली आहेत.
या ३० मुलांची सुटका करत ४ तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. पूर्णिया जिल्ह्य़ातून सांगली येथे या मुलांची तस्करी होत असल्याचे चौकशीत या आरोपींनी सांगितले आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलांना मदरशाचा ड्रेस घालण्यात आला होता. २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत CWC/जळगावला पाठवण्यात आले. तर मनमाड येथे सुटका झालेल्या ३० बालकांना चाइल्ड हेल्प डेस्क एनजीओ नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चार तस्करांविरुद्ध Cr नं. 408/23 अन्वये 370 मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर एका तस्कराविरोधात 370 IPC मनमाडमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या मुलांचे जबाब नोंदविले जाणार आहेत.