मंगेश कराळे -नालासोपारा - मोरेंगाव नाका यथे एका आरोपीला १ गावठी कट्टा, १ गावठी पिस्तुल, ११ जिवंत काडतुसे, १०० ग्रॅम एमडीसह गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली. इतकी मोठी कारवाई झाल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. तुळींज पोलिसांनी एनडीपीएस आणि आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने हा मुद्देमाल कुठून व कोणता घातपात करण्यासाठी आणला होता? याचा पोलीस शोध घेत आहेत.
रविवारी वसई विरार महानगरपालिकेची मॅरेथॉन असल्याने कुठलाही अनुकुचित प्रकार किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वसईत सर्वत्र मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना अंमली पदार्थ व शस्त्र साठा एका आरोपीकडे असल्याची महत्वपूर्ण खबर्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, मंगेश चव्हाण, संजय नवले, पोलीस हवालदार महेश पागधरे, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर आणि अमोल कोरे यांच्या टीमने रविवारी सकाळी सापळा रचला.
मोरेंगाव नाक्यावरील लाईटचे डीपीजवळ आरोपी राजकुमार गुप्ता उर्फ राजू बैल (३४) याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्या कब्जातील प्लास्टिक पिशवीमध्ये १० लाख रुपये किंमतीचा १०० ग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ तसेच ७१ हजार रुपये किंमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्तुल, १ गावठी कट्टा व ११ जिवंत काडतुसे जवळ बाळगलेली मिळून आली आहे. पोलीस हवालदार रमेश आलदर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.