नागपूर (कामठी) : शौचालय वापराच्या वादातून कामठीच्या रमानगर येथे लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली. खुशाल ताराचंद बोरकर (५०) असे मृताचे तर सुरेश ताराचंद बोरकर (४५) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार हे दोन्ही भाऊ विवाहित असून रमानगर येथील घरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरील दोन रूममध्ये भाडेकरू राहतात. तर या दोन्ही भावांचे कुटुंब उर्वरित दोन वेगवेगळ्या रूममध्ये राहत होते. त्यांचे स्वतंत्र शौचालय आहेत. या दोघांमध्ये काही दिवसांपासून वैचारिक वाद होता. यातच रविवारी मोठा भाऊ खुशाल याने लहान भाऊ सुरेश याचे शौचालय वापरले. यामुळे त्यांच्यात वाद झाला. यात सुरेश याने खुशालच्या छातीवर शस्त्राने वार करीत हत्या केली व घटनास्थळावरून पसार झाला. ही माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. स्थानिक नागरिकांनी खुशाल याला उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले.
मृत खुशालच्या पश्चात पत्नी व बारा वर्षाचा मुलगा आहे. माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठले. येथे पंचनामा करीत हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त केले. खुशालची पत्नी सीमा हिने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुरेश बोरकर याच्यावर कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहीस्तोवर आरोपीस अटक झालेली नव्हती.