काेंढाळी : राेडवर असलेला खड्डा चुकविण्याच्या नादात अनियंत्रित कार दुभाजकारवर धडकली आणि सर्व्हिस राेडवर बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या पाच जणांना उडवत उलटली. यात गंभीर जखमी झालेल्या पाच जणांपैकी चाैघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश आहे. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सातनवरी येथे रविवारी (दि. ३) दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली.
बंडू ऊर्फ गौतम जागो सालवणकर (५५, रा. सातनवरी, ता. नागपूर ग्रामीण), शाैर्य सुबोध डोंगरे (९), शिराली सुबोध डोंगरे (६) दाेघेही रा. इसापूर, ता. माैदा व चिन्नू विनोद सोनबरसे (१३, रा. सातनवरी, ता. नागपूर ग्रामीण) अशी मृतांची नावे आहेत. या चाैघांचाही उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला. या अपघातात ललिता बाबुलाल सोनबरसे (५०, रा. सातनवरी) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. (Car Accident in Nagpur, 4 dead.)
हे पाचही जण सात सातनवरी येथील बसस्टाॅपजवळ बसची प्रतीक्षा करीत उभे हाेते. त्यातच अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणारी अनियंत्रित कार खड्डा चुकविण्याच्या नादात सातनवरी येथील बसस्टाॅप जवळील दुभाजकावर आदळली व लगेच सर्व्हिस राेडवर उलटली. तत्पूर्वी या सुसाट कारने राेडलगत उभ्या असलेल्या पाच जणांना जबर धडक दिली. त्यात पाचही जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पाचही जखमींना लगेच नागपूर येथील हाॅस्पिटलमध्ये रवाना केले. मात्र, यातील चाैघांचा वाटेतच मृत्यू झाला. मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावासह अन्य एका मुलाचा समावेश आहे. जखमी महिलेवर नागपूर येथील हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.