पंजाबच्या अमृतसरमध्ये आता दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांवर तलवारी, काठ्यांनी हल्ला करण्यात आला होता. आज खलिस्तानी समर्थक नेता अमृतपाल सिंगच्या समर्थकांनी पोलीस ठाणेच ताब्यात घेतले आहे. हातांत शस्त्रे आणि तलवारी घेऊन अजनाला पोलीस ठाण्यावर कब्जा मिळविला आहे.
यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी वारिस पंजाब दे संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ समर्थकांनी अमृतसरमध्ये हा गोंधळ घातला आहे. यावेळी पोलिसांना धक्काबुक्की केली.
खलिस्तान समर्थक अमृतपाल त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. पंजाबी अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्धू याच्या पुण्यतिथीनिमित्त अमृतपाल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यादरम्यान अमृतपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंचावरून धमकी दिली होती. इंदिराजींच्या बाबतीत जे घडले ते करू असे अमृतपाल यांनी म्हटले होते. 'पंजाबचा प्रत्येक मुलगा खलिस्तानबद्दल बोलतो. या जमिनीवर आमचा हक्क आहे कारण आम्ही येथे राज्य केले आहे. अमित शहा असोत, मोदी असोत किंवा भगवंत मान असोत, यातून कोणीही आम्हाला मागे हटवू शकत नाही. संपूर्ण जगाचे सैन्य आले आणि म्हणाले तरी आम्ही आमचा दावा सोडणार नाही, असे ते म्हणाले होते.