नवी दिल्ली – सध्या जगभरात कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. या काळात ऑनलाइन व्यवहार आणि कामकाज मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने सायबर गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच ऑनलाइन इंटिलिजेंस कंपनी सायबलने सांगितले आहे की, २.९१ कोटी भारतीयांचा पर्सनल डेटा डार्क वेब यावर लीक झाला आहे.
हा डेटा संपूर्णपणे मोफत उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने शुक्रवारी एका ब्लॉगमध्ये दावा केला आहे की, नोकरीच्या शोधात असणाऱ्या २.९१ कोटी भारतीय लोकांचा पर्सनल माहिती लीक झाली आहे. सामान्यत: अशा घटना होत असतात मात्र यामध्ये विशेष लक्ष देण्यासारखं म्हणजे अतिशय वैयक्तिक माहितीचा समावेश यामध्ये आहे. यात शिक्षण, पत्ता, ईमेल, फोन, योग्यता, कामचा अनुभव या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
तसेच अलीकडेच सायबलने फेसबुक आणि अनएकेडमीच्या हॅकिंगची माहितीही समोर आणली होती. सायबल यांनी निवेदनात म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार अशा वैयक्तिक माहितीच्या शोधात राहतात. जेणेकरुन ते लोकांच्या नावाची ओळख चोरी, घोटाळा किंवा हेरगिरी यासारख्या गोष्टी करू शकतात. या महिन्याच्या सुरूवातीस, सर्वात मोठ्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्म अनएकेडमी हॅक झाल्याची बातमी समोर आली होती. त्यावेळी यूएस-स्थित सुरक्षा कंपनी सायबलने देखील याची नोंद केली होती, त्यानुसार हॅकर्सने सर्व्हर हॅक करून २२ मिलियन (सुमारे 2.2 कोटी) विद्यार्थ्यांची माहिती चोरली होती.
दरम्यान, हा डेटा ऑनलाइन डार्क वेबवर विकला जात आहे. त्यापैकी विप्रो, इन्फोसिस, कॉग्निझंट, कॉग्निझंट, गुगल आणि फेसबुक मधील कर्मचार्यांचीही माहिती आहे. सिक्युरिटी फर्म सिबिलच्या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, अनएकेडमीचा २१,९०९,७०७ डेटा लीक झाला होता, ज्याची किंमत २ हजार अमेरिकन डॉलर्स आहे. अहवालानुसार, अनएकेडमीच्या संकेतस्थळावरून आलेल्या डेटामध्ये वापरकर्ता नाव, संकेतशब्द, शेवटची लॉगिन तारीख, ईमेल आयडी, पूर्ण नाव, खाते स्थिती आणि विद्यार्थ्यांचे खाते प्रोफाइल यासारख्या अनेक महत्वाच्या माहितीचा समावेश आहे. अनएकेडमीचे बाजार मूल्य ५०० मिलियन डॉलर्स (सुमारे ३,७९८ कोटी रुपये) आहे.